औरंगाबाद | लष्करात पाच वर्षापूर्वी भरती झालेल्या एका जवानांनी पहाटे मैदानातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना रविवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास इतर जवान मैदानावर सरावासाठी आल्यानंतर त्यांच्या निदर्शनास आढळून आली. मल्हार वन्नन राममूर्ती (वय 26) असे मृत जवानांचे नाव आहे.
मल्हार राममूर्ती हे मूळचे तामिळनाडू राज्यातील कृष्णागिरी येथील रहिवासी होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांची बदली औरंगाबाद येथील छावणी परिसरात झाली होती. मल्हार राममूर्ती हे अविवाहित असून त्याच्या मित्रांसोबत राहत होते. शनिवारी संध्याकाळी नेहेमीप्रमाणे इतर सहकाऱ्यांसोबत त्यांनी जेवण केले, त्यांच्याशी बोलून चालून ते झोपी गेले.
सकाळच्या सुमारास लष्करातील अधिकारी, जवान मैदानावर सरावासाठी आले असता त्यांना ‘169 ऑफिसर मेस’ च्या बाजूच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेतत मल्हार राममूर्ती आढळले. हे निदर्शनास आल्यानंतर सुभेदार पोपट जाधव व इतरांनी त्यांचा मृतदेह खाली उतरवून घाटीत रवाना केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदन झाल्यानंतर लष्करकाराने पार्थिव त्याब्यात घेऊन त्यांच्या मूळ गावी पाठवले. छावणी पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता त्यांच्या आत्महत्येचे गूढ अजूनही उलगडलेले नाही. पुढील तपास सहायक सुभेदार भगवान वाघ करीत आहेत.