देशभरात रेल्वेचे जाळे मजबूत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये रेल्वेची मोठी महत्वपूर्ण भूमिका आहे. राज्याचा विचार करता अद्यापही राज्यात असे काही भाग आहेत जिथे रेल्वे पोहचली नाहीये. मात्र राज्यातल्या एका जिल्ह्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण या जिल्यात एक नाही तर 3 रेल्वे स्थानके उभारली जाणार आहेत. चला जाणून घेऊया याविषयी अधिक माहिती…
रायगड जिल्ह्यात उभी राहणार 3 नवी रेल्वे स्थानके ?
रायगड जिल्ह्यातील रेल्वे समस्यांचे निराकरण व्हावे या हेतूने खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. रेल्वे अधिकाऱ्यांसमवेत ही बैठक पार पडली.या बैठकीत जिल्ह्यामध्ये नवीन रेल्वे स्थानके विकसित करण्यात यावेत अशा सूचना तटकरे यांनी दिल्या.मध्य रेल्वेच्या पनवेल ते रोहा या मार्गावर तीन नवीन रेल्वे स्टेशन उभारण्याचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे पाठवण्याच्या सूचना खासदार महोदयांनी दिल्यात.
महत्त्वाचे म्हणजे तटकरे यांनी आपण स्वतः रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन हा प्रस्ताव मार्गी लावू अशी मोठी ग्वाही देखील दिली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात 3 नवीन रेल्वे स्थानक आगामी काळात तयार होऊ शकतात आणि यामुळे प्रवाशांना दिलासा मिळेल असे बोलले जात आहे.
‘या’ ठिकाणी होणार रेल्वे स्थानके
पनवेल ते रोहा या मार्गावर खारपाडा, गडब, आमटेम येथे नवीन स्टेशन विकसित करण्याचा प्रस्ताव पाठवला जाणार आहे. खरे तर खारपाडा रेल्वे स्टेशनचा प्रस्ताव याआधीच दिलेला पाठवण्यात आला होता. परंतु, जिते स्टेशन आणि खारपाडापर्यंतचे अंतर कमी होत असल्याने तो प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडून मंजूर करण्यात आला नाही. यामुळे जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांचा हिरमोड झाला होता.
पण आता ही अडचण दूर होणार आहे. खारपाड़ा येथे होणारे रेल्वे स्टेशन दुष्मी हद्दीमध्ये करण्यात यावे, अशा सूचना खासदार तटकरे यांनी रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना केली आहे. त्यामुळे आता खारपाडा स्टेशनसह गडब, आमटेम या तीन स्टेशनांचा प्रस्ताव मध्य रेल्वेकडून सादर केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.