ओडिशात 15 दिवसांत 3 रशियन नागरिकांचा मृत्यू; नेमकं चाललंय तरी काय??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओडिशात रशियन नागरिक मृतावस्थेत सापडण्याची प्रक्रिया थांबताना दिसत नाही. यापूर्वी बी व्लादिमीर आणि पॉवेल अँथम यांच्यानंतर आणखी एक रशियन नागरिकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मिलियाकोव सर्गेई असं मृत व्यक्तीचे नाव असून जगतसिंगपूर जिल्ह्यातील पारादीप बंदरातील जहाजाच्या अँकरेजमध्ये त्याचा मृतदेह सापडला. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समजत आहे. मात्र चिंतेची बाब म्हणजे गेल्या 15 दिवसात 3 रशियन नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

मृत रशियन नागरिक मिलियाकोव सर्गेई हा जहाजावर मुख्य अभियंता म्हणून काम करत होता. त्याचा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत अधिकृतपणे समजू शकले नाही, परंतु हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र, बंदर प्रशासनाने यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मिलियाकोव सर्गेईचा मृत्यू रात्री उशिरा झाल्याची माहिती पारादीप बंदराचे अध्यक्ष पीएल हरनाड यांनी दिली.

धक्कादायक म्हणजे, याआधी ओडिशातील रायगडामध्ये 2 रशियन नागरिकांचा मृत्यू झाला होता. 22 डिसेंबरला रायगडा येथील हॉटेलमध्ये थांबलेले रशियन पर्यटक व्लादिमीर बिदानोव यांचा हॉटेलच्या खोलीत संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. यानंतर रायगडा पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने अंतिम संस्कारासाठी रशियन राजदूताशी संपर्क साधला. व्लादिमीरचा मुलगा भारतात येण्याची शक्यता नसल्यामुळे रशियाच्या राजदूताच्या संमतीने मृतदेहाचे शवविच्छेदन करून अंतिम संस्कार करण्यात आले. प्राथमिक तपासानुसार व्लादिमीर यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यानंतर, 24 तारखेला आणखी एका रशियन पर्यटकाचा मृत्यू झाला. 65 वर्षीय पावेल अँटोनोव असे मृताचे नाव आहे. त्यामुळे ओडिशात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न उपस्थित होतोय.