कृष्णा हाॅस्पीटल समोरील 3 दुकानांना आगीच्या भक्ष्यस्थानी : लाखोंचे नुकसान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | मलकापूर शहर हद्दीतील व कृष्णा हाॅस्पीटल समोर असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील तीन दुकानांला आज मंगळवारी (दि. 4) दुपारी तीनच्या सुमारास लागलेल्या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाले. फ्रुट आणि ज्युसच्या लागलेल्या दुकानांची आग भडकल्याने शेजारील दोन बेकरीही आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. अद्याप आगीचे कारण अस्पष्ट आहे.

कराड- मलकापूर येथे प्रसिध्द असलेले कृष्णा हाॅस्पीटल समोर आज दुपारी मंगळवारमुळे बंद असलेल्या दुकानातून धूर येवू लागला होता. याबाबतची माहीती काही नागरिकांनी कराड नगरपालिका आणि कृष्णा हाॅस्पीटलच्या अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्‍काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवली. मलकापूर येथील कृष्णा हॉस्पिटलच्या समोरील बाजूस कृष्णा हॉस्पिटलचे मुख्य गेट ते ढेबेवाडी फाटा दरम्यान सेवा रस्त्यालगत अनेक व्यवसायिकांची दुकाने एकमेकांना लागून आहेत. यामध्ये स्टेशनरी, ज्यूस विक्री, हॉटेल, फळे विक्री यासह छोट्या-मोठ्या व्यवसायिकांचा समावेश आहे.

आज दुपारी बंद असलेल्या एका दुकानातून दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अचानकपणे आग लागली. त्यामुळे व्यावसायिकांसह परिसरातील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. या आगीने काही क्षणातच बाजूच्या अनेक दुकानांना वेढा दिला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. अग्निशामक दलाच्या तत्परतेने आग विझविण्यात यश आले, अन्यथा अन्य व्यावसायिकांचेही मोठे नुकसान झाले असते.