मध्यप्रदेशमधील रेल्वे प्रवास आणखी जलद आणि सुलभ होणार आहे. राज्यात सध्या कोट्यवधी रुपयांचे रेल्वे प्रकल्प कार्यान्वित असून, यामुळे प्रवासाची गुणवत्ता आणि वेग वाढणार आहे. याच दरम्यान रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मध्यप्रदेशला तीन नवीन सुपरफास्ट ट्रेनची मोठी भेट दिली आहे. या ट्रेन्समुळे मध्यप्रदेश थेट महाराष्ट्र, कर्नाटक आणि छत्तीसगडशी जोडला जाणार आहे. व्यवसाय, शिक्षण आणि नोकरीसाठी सतत प्रवास करणाऱ्यांसाठी ही एक मोठी दिलासा देणारी बातमी आहे.
रीवा-पुणे थेट सुपरफास्ट ट्रेन
रेल्वेमंत्री वैष्णव यांनी जाहीर केलेल्या पहिल्या ट्रेनची सेवा रीवा ते पुणे दरम्यान असणार आहे. पुणे हे शैक्षणिक आणि नोकरीचं केंद्र असल्यामुळे रीवा, सतना, जबलपूर आणि इटारसीमार्गे पुणेपर्यंत थेट ट्रेनची मागणी गेल्या काही वर्षांपासून सुरू होती. आता ही मागणी पूर्ण होत असून, ट्रेनच्या वेळापत्रकाची आखणीही पूर्ण झाली आहे. पुढील दोन महिन्यांत ही ट्रेन सुरू केली जाणार आहे.
जबलपूर-रायपूर ट्रेनमुळे आदिवासी पट्ट्यांना दिलासा
दुसरी नवीन ट्रेन जबलपूर ते रायपूर या मार्गावर चालवण्यात येणार आहे. नैनपूर, बालाघाट आणि गोंदिया अशा आदिवासी बहुल भागांमधून ही ट्रेन जाणार आहे. या मार्गावरून आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या जबलपूर आणि रायपूर शहरांमध्ये थेट कनेक्टिव्हिटी मिळेल. यामुळे स्थानिक विकासालाही चालना मिळणार आहे. ही ट्रेन देखील दोन महिन्यांत सुरू होणार आहे.
ग्वाल्हेर-गुना-बेंगळुरू ट्रेन: IT आणि विद्यार्थ्यांसाठी वरदान
मध्यप्रदेशला मिळणारी तिसरी नवी ट्रेन ग्वाल्हेर-गुना-भोपालमार्गे बेंगळुरू पर्यंत धावणार आहे. बेंगळुरूमध्ये शिक्षण आणि IT क्षेत्रात काम करणाऱ्या मध्यप्रदेशातील नागरिकांची संख्या मोठी आहे. या ट्रेच्या सुरूवतीने गुना आणि भोपालसारख्या भागांमधून बेंगळुरूला थेट पोहोचणं सुलभ होईल. यासाठी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दोनदा रेल्वे मंत्रालयाला पत्रव्यवहार केला होता.
रतलाम-नागदा मार्गासाठी तिसरी आणि चौथी रेल्वे लाईन मंजूर
याशिवाय रेल्वेमंत्री वैष्णव यांनी रतलाम-नागदा दरम्यान ४१ किलोमीटरच्या नवीन तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे लाईनला मंजुरी दिल्याची माहिती दिली. यासाठी 1,018 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे दरवर्षी ७.५ कोटी लिटर डिझेल आणि ३८ कोटी किलोग्रॅम कार्बन डाय ऑक्साईडची बचत होणार आहे. पर्यावरणीय दृष्टिकोनातून हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
या तीन सुपरफास्ट ट्रेन्समुळे मध्यप्रदेशातील प्रमुख शहरांचा संपर्क दक्षिण आणि पश्चिम भारताशी अधिक दृढ होणार आहे. यामुळे व्यापार, शिक्षण, रोजगार आणि पर्यटन क्षेत्रांना चालना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.