एसटी कर्मचाऱ्यांना 34 टक्के महागाई भत्ता लागू; शिंदे-फडणवीस सरकारचा महत्वाचा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून या सरकारने अनेक महत्वाचे आणि मोठे निर्णय घेतले आहेत. अशाच एक महत्वाचा निर्णय आज राज्य सरकारच्यावतीने घेण्यात आला. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांकडून गेल्या अनेक महिन्यांपासून महागाई भत्ता वाढीची मागणी राज्य सरकारकडून मान्य करण्यात आली आहे. आज राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांना 34 टक्के महागाई भत्ता जाहीर केला आहे.

कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीचे पत्र एसटी महामंडळाला सरकारच्यावतीने नुकतेच पाठवण्यात आले. एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 34 टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय मागील काही काळापासून रखडला होता. या प्रस्तावित भत्त्यावर निर्णय होत नसल्याने एसटी कामगार संघटना आक्रमक झाल्या होत्या तसेच त्यांच्याकडून आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला होता.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 34 टक्के महागाई भत्ता असून, एसटी कर्मचाऱ्यां मात्र 28 टक्के भत्त्यावर समाधान मानावे लागत होते. दरम्यान राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आता राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कर्मचाऱ्यांमधून राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.