इंदोरमधील ‘ती’ विहीर ठरली “मौत का कुआं” ; आत्तापर्यंत 35 जणांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काल रामनवमीच्या दिवशीच इंदोर येथील श्री बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिराच्या आवारात बांधलेल्या विहिरीवरील छत कोसळून मोठी दुर्घटना घडली. या घटनेत आत्तापर्यन्त ३५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर डझनहून अधिक लोक जखमी झाले आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज घटनास्थळाची पाहणी केली. तसेच रुग्णालयात दाखल जखमींची आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

काल या मंदिरात राम जन्मोत्सवाचा आनंद साजरा होत असतानाच भाविकांवर काळाचा घाला बसला. पूजेच्या वेळी जेव्हा अनेक भाविक विहिरीच्या छतावर उभे होते, तेव्हा अचानक हे छत कोसळल्याने त्यावर उभे असलेले भाविक विहिरीत पडले. या भाविकांना बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदतकार्य सुरु होते. मात्र सुमारे 50 फूट खोल असलेल्या विहिरीत पडल्याने अनेक भाविकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेने संपूर्ण देश हळहळला आहे.

दरम्यान या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दुःख व्यक्त केलं आहे. इंदूरमधील दुर्घटनेने अत्यंत दु:ख झाले आहे. मी याबाबत मुख्यमंत्री शिवराज चौहान यांच्याशी बोललो असून परिस्थितीचा अपडेट घेतला. राज्य सरकार जलद गतीने बचाव आणि मदत कार्य करत आहे. सर्व पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत माझी प्रार्थना आहे. तसेच मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपयांची आर्थिक मदत तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत दिली जाईल, अशी घोषणा नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे केली.