महाबळेश्वरच्या 3 रस्त्यांसाठी 36 कोटीचा निधी : पल्लवी पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

महाबळेश्वर | येथील पर्यटनस्थळांकडे जाणारे तीन प्रमुख रस्त्यांच्या कामासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली असून, या कामासाठी साधारण 36 कोटी रुपयांचा निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या तीन रस्त्यांच्या कामाच्या निविदा लवकरच प्रसिध्द होऊन कामाला लवकरच सुरुवात होईल, अशी माहिती पालिकेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑगस्टमध्ये जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली होती. मुख्याधिकारी यांनी विविध विकासकामांचे प्रस्ताव सादर केले होते. या प्रस्तावावर मुख्यमंत्री शिंदे यांनी चर्चा करून या विकासकामांसाठी साधारण 215 कोटी रुपये तत्काळ मंजूर केले होते. या कामांचे प्रस्ताव तातडीने पाठविण्याच्या सूचनाही राजभवनावर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांना केल्या होत्या. या प्रस्तावावर तत्काळ निधी मंजूर केला आहे.

महाबळेश्वर ते क्षेत्र महाबळेश्वर, लॉडविक पॉइंट रोड व डचेस रोड या तीन रस्त्यांच्या कामाचे प्रस्ताव नगरपालिकेने राजभवनावरील बैठकीपूर्वीच साधारण 11 महिन्यांपूर्वी सादर केला होता. या तीन रस्त्यांच्या कामाला सचिवांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आता या तीन रस्त्यांच्या कामाच्या निविदा प्रसिध्द करण्याचा पालिकेचा मार्ग मोकळा झाला आहे. निविदा तातडीने मंजूर करून 2023 मध्ये या रस्त्यांच्या कामाला सुरुवात होईल, असे मुख्याधिकारी पाटील यांनी सांगितले.