पाटणमध्ये भीषण आगीत 4 घरे जळून खाक; साडे सोळा लाखांचे नुकसान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा । सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात 4 घराना भीषण आग लागून चारही घरे आगीत खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तालुक्यातील कुंभारगाव विभागातील शेंडेवाडी पवारवाडीत ही घटना घडली आहे. या आगीत घरातील धान्य, कपडे, भांडी व प्रापंचिक साहित्य जळाल्याने जवळपास साडेसोळा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.. आगीचे नेमकं कारण मात्र अद्याप समोर आलेलं नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की, पवारवाडीतील पवार कुटुंबीयांच्या घराला आज सकाळी साडेनऊच्या सुमारास अचानक आग लागली. आग लागताच घरातील महिलांनी आरडाओरडा केला. यावेळी आसपासच्या लोकांनी आग वीजवण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थ व युवकांनी पेटत्या घराच्या छपरावर चढून कौले व पत्रे काढून आत पाण्याचा मारा सुरू केला. यावेळी सरपंच राहुल मोरे व युवकांनी पेटत्या घरात शिरून गॅस सिलिंडर धाडसाने बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली.

यानंतर, कराड व पाटणहून पाचारण केलेले अग्निशमन दल वाहतुकीची कोंडी भेदत आडवळणीच्या मार्गाने घटनास्थळी पोचेपर्यंत चारही घरे जळून मोठे नुकसान झाले होते. मंडल अधिकारी एस. जे. जांगडे, तलाठी डी. जी. कोडाप्पे, दीपक इंगवले आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. लक्ष्मण बाबूराव पवार यांचे 4 लाख 30 हजार रुपयांचे, दादू सखाराम पवार यांचे 4 लाखांचे, हरिबा ज्ञानदेव पवार यांचे 3 लाख 85 हजार रुपयांचे आणि श्यामराव सखाराम पवार यांचे 4 लाख 35 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज पंचनाम्यात वर्तविला आहे.