40 हत्ती त्याच्या घराभोवती तब्बल 2 दिवस काहीही न खाता पिता, अखंड अश्रू ढाळत उभे होते..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विचार तर कराल : सगळे हत्ती डोळ्यांत प्राण आणून वाट बघत होते. पहिल्यांदाच असं झालंवतं की त्यांचा लाडका लाॅरेन्स त्यांना भेटायला आला नव्हता. त्या बिचार्‍या मुक्या प्राण्यांना काय माहित की लाॅरेन्स हे जग सोडून गेलाय ! शेवटी वाट पाहून-पाहून सगळे हत्ती त्याचं घर शोधायला जंगलातून त्याच्या गांवाकडं निघाले…

पंचवीस तीस वर्षांपूर्वीची गोष्टय ही.. आफ्रिकेतल्या एका छोट्या देशातल्या छोट्या खेडेगावातली. तिथं काही हत्तींचा ग्रुप होता. गांवकर्‍यांची अशी तक्रार होती की, ही जनावरं ‘जंगली’ आहेत.. पिसाळलेली. या हत्तींमुळे आमच्या जीवाला आणि मालमत्तेला धोकाय. खूप तक्रारी आल्यावर गव्हर्नमेंटनं सांगितलं की हे सगळे हत्ती कोणीही घेऊन जाऊ शकतं. त्याचे त्यानं कसलेही पैसे देण्याची गरज नाही.

त्याच खेडेगावातला एक माणूस लॉरेन्स अँथनी यानं या हत्तींची जबाबदारी घेतली.. त्यानं हत्तींसाठी एक ‘एलिफन्ट रिजर्व’ तयार केला.. त्याला नाव दिलं ‘थुला थुला’ ! याचा अर्थ ‘शांतता’.. पण हत्तींच्या देखभालीसाठी माणसं मिळेनात. सगळे त्यांना घाबरत होते. शेवटी लॉरेन्स ने ठरवलं की रोज स्वत: या हत्तींबरोबर वेळ घालवायचा. खेळायचं, कधी-कधी तिथेच रहायचं-झोपायचं..

हळूहळू लाॅरेन्सची त्या हत्तींबरोबर लै भारी मैत्री झाली. लळाच लागला एकमेकांचा. हे हत्ती पिसाळलेले-क्रूर आहेत, या अफवा होत्या हे त्यानं सिद्ध केलं. त्यांना अमाप प्रेम दिलं लाॅरेन्सनं. प्रेमाच्या बदल्यात त्याहून जास्त प्रेम देतात हे प्राणी ! हळूहळू या हत्तींची संख्या वाढत गेली. लॉरेन्सनं सगळ्यांना जीवापाड जपलं.. काळजी घेतली.. एक कुटूंबच झालं जणू !

…असा हा लाॅरेन्स वीस वर्षांपूर्वी हे जग सोडून गेला, तेव्हा जणू एक चमत्कारच घडला. लाॅरेन्स गेल्याची हत्तींना खबरच नव्हती. इतके दिवस तो भेटायला का आला नाही म्हणून सगळे हत्ती काळजीत पडले. एकत्र आले. त्याच्या आठवणीनं व्याकूळ झाले. त्यांना सवय झालीवती लाॅरेन्सच्या येण्याची. मजामस्तीची. मग हे सगळे हत्ती जवळपासच्या जंगलांमधून वीस किलोमीटर लांब चालत त्याच्या घरापाशी आले.. विशेष म्हणजे याआधी त्यांना त्याचं घर माहिती नव्हतं. पण नेमके ते तिथे कसे आले याचं सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं ! जवळपास चाळीस हत्ती त्याच्या घराभोवती तब्बल दोन दिवस काहीही न खाता पिता, अखंड अश्रू ढाळत उभे होते… मन हेलावून टाकणारं दृश्य पाहून अख्खा देश नि:शब्द झाला होता…

भावांनो, कुठलंपण मुकं जनावर असो, तुम्ही त्याच्यावर प्रेम केलंत तर ते शंभरपटींनी जास्त प्रेम तुमच्यावर करतं.. ‘जंगली असणं’ हा त्याचा मूळ गुणधर्म आहे.. पण त्यांना स्पर्श कळतो, जिव्हाळा जाणवतो. बाकी काही नको असतं त्यांना तुमच्याकडून. सगळ्यात कृतघ्न आणि लालची असतो तो ‘माणूस’ ! माणूस स्वार्थासाठी जवळच्या माणसाचाही घात करायला मागेपुढे बघत नाही… आणि गंमत म्हणजे अशा घातकी माणसाबद्दल बोलताना आपण कुत्सीतपणे त्याला ‘जनावर’ म्हणतो !
जानवर तो बेवजह ही बदनाम है साहब,
इन्सान से ज़्यादा कोई ख़ूँख़ार नहीं…

– किरण माने.
(फेसबुकवरुन साभार)