हवाई प्रवास करायचं सोलापूरकरांचं बऱ्याच वर्षांपासूनच स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे. कारण डीजीसीए आणि विकास ब्युरो ऑफ सिविल एव्हिएशन सिक्युरिटी या दोन्ही यंत्रणांच्या परवानगी नंतर आता सोलापूरचे होटगी रोड विमानतळ विमान सेवेसाठी सज्ज झाल्याची माहिती आहे. या प्रकरणात आता केवळ अंतिम मंजुरी मिळून मार्ग आणि विमान कंपन्या निश्चित झाल्यानंतर येथून एटीआर ही 40 ते 70 सीटर विमान उड्डाण करतील.
सोलापूरच्या होटगी रोड विमानतळासाठी सिद्धेश्वर कारखान्याची 92 मीटर चिमणी ही अडथळा ठरत होती. मात्र 15 जूनला ही चिमणी पाडण्यात आली त्यानंतर दोन महिन्यात विमानसेवा सुरू होईल असं सांगण्यात आलं होतं मात्र वर्ष होऊनही विमानसेवा सुरू झाले नाही. त्यानंतर रनवे, संरक्षक भिंत, पिण्याच्या पाण्याची सोय, ड्रेनेज अशी कामे देखील तातडीने निविदा काढून पूर्ण करण्यात आली. 2009 मीटर लांबीचा रनवे तयार करण्यात आला असून त्यावरूनच विमान उतरणार आणि उड्डाण देखील करणार आहेत.
दोन महिन्यात सुरू होणार विमान सेवा
खरंतर केंद्र सरकारच्या उडान योजनेतून सोलापूरची विमान सेवा सुरू होणार आहे 15 जून 2016 ला या उडान योजनेमधून सोलापूरची निवड करण्यात आली होती मात्र तब्बल आठ वर्षांनी ही सेवा सुरू होणार आहे. देशातल्या सामान्य लोकांनाही माफक दरामध्ये विमानातून प्रवास करता यावा हा त्या योजनेचा उद्देश आहे. सोलापूरची विमानसेवा आता दोन महिन्यात सुरू होईल. तूर्तास विमान कंपन्या व पहिल्यांदा कोणते मार्ग असतील या संदर्भात वरिष्ठ स्तरावर बोलणे सुरू असल्याची माहिती होटगी रोड विमानतळाचे व्यवस्थापक बनोत चंपला यांनी एका माध्यमाशी बोलताना दिली आहे.
कोणत्या मार्गावर विमानं घेणार उड्डाण ?
दरम्यान तुम्हाला जर प्रश्न पडला असेल की सोलापूरहून कोणत्या भागासाठी विमानसेवा सुरू करण्यात येईल तर त्यामध्ये सुरुवातीला सोलापूर ते मुंबई हैदराबाद, गोवा या मार्गावर विमान सेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती आहे.
नाईट लँडिंग नाही
लवकरच या विमानतळावरून पहिल्या टप्प्यात दिवसा विमानसेवा सुरू होणार आहे. विमानसेवेचा प्रतिसाद प्रवासांची संख्या पाहून नाईट लँडिंग ची सोय केली जाणार आहे. त्यापूर्वी विमान कंपन्या, मार्ग निश्चित होणे जरुरी असून केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या माध्यमातून त्या संदर्भात युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.