कर्नाटकची तहान भागविण्यासाठी कोयना धरणातून 4200 क्यूसेक पाण्याचा विसर्ग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या उन्हाळ्यामुळे नद्यामधील पाणी पातळी खालावत आहे. परिणामी कर्नाटकमध्येही पाण्याची कमतरता भासत असल्यामुळे कर्नाटक शासनाने पिण्यासाठी कोयना धरणातून तीन टीएमसी पाणी सोडण्याची मागणी केली आहे. त्यानुसार आदेश मिळाल्यानंतर मंगळवारी रात्रीपासून 1 टीएमसी पाणी सोडण्यास प्रारंभ झाला आहे. तर सध्या पायथा वीजगृह, सिंचन आणि पिण्यासाठी मिळून धरणातून एकूण 4200 क्यूसेक पाणी विसर्ग सुरू झाला आहे.

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता 105.25 TMC आहे. दरवर्षी ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात धरण भरते. या धरणातील पाण्यावर वीजनिर्मिती होते. तसेच, सिंचन आणि पिण्यासाठी पाणीही सोडले जाते. उन्हाळ्यात ही मागणी अधिक वाढत जाते. त्याप्रमाणात पाणी विसर्ग केला जातो. सध्या धरणात 38 TMC पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या धरणाच्या पायथा वीजगृहातील दोन्ही युनिट सुरू आहेत. त्यामुळे 2100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर नदी विमोचकातूनही पिण्यासाठी आणि सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत होते. असे असतानाच कडक उन्हामुळे पिण्यासाठी आणि सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढत आहे.

त्यामुळे धरण व्यवस्थापन मागणीनुसार पाणी सोडत आहे. असे असतानाच आता कर्नाटक शासनाने पिण्यासाठी कोयना धरणातून तीन टीएमसी पाणी सोडण्याची मागणी केली आहे. कर्नाटकने तीन टीएमसीची मागणी केली असलीतरी त्यापैकी 1 TMC पाणी सोडण्याबाबतचा आदेश धरण व्यवस्थापनला मिळाला आहे. नदी विमोचकाद्वारे हे पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे विमोचकातून आता 2100 आणि पायथा वीजगृह 2100 असा मिळून कोयना धरणातून 4200 क्यूसेक पाणी विसर्ग सुरू झाला आहे.