दहिहंडीत कोयता नाचविल्याने 4 अल्पवयीन मुलांसह 5 जण पोलिसांच्या ताब्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले मित्र समूहाने आयोजित केलेल्या दहीहंडीत साताऱ्यातील तालीम संघाच्या मैदानावर तुफान गर्दी होऊन मोठ्या प्रमाणात हुल्लडबाजी झाली. या दही हंडीत पोलिसांची परवानगी भोंग्यासाठी असताना पोलीस परवानगी झुगारत डॉल्बीचा सर्रास दणदणाट करण्यात आला. उपस्थित तरुणांनी गर्दीमध्ये कोयता नाचवत नृत्य केल्याची गंभीर दखल घेत सातारा पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतले आहे.

साताऱ्यात तालीम संघाच्या मैदानावर रविवारी झालेल्या दहीहंडी कार्यक्रमात कोयते हातात नाचवून दहशत माजवणाऱ्यांची सातारा शहर पोलिसांनी धरपकड केली आहे.. आतापर्यंत पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून धक्कादायक बाब म्हणजे यातील चार जण हे अल्पवयीन आहेत. युवकांच्या हातात कोयता दिसल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने दहीहंडी पाहायला आलेल्या महिला आणि जेष्ठ नागरिकांमध्ये गोंधळ उडाला होता. भीतीपोटी काही नागरिकांनी कार्यक्रमातून पळ काढला. कोयता नाचवणाऱ्या युवकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करत कोयता जप्त केला आहे. साताऱ्यात अल्पवयीन युवकांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याने हा चिंतेचा विषय असून त्यांना वेळीच बंधने घालणे गरज असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी सांगितले आहे.

भैरवनाथ गोविंदा पथकाने पटकाविले 1 लाख 77 हजार 777 रूपयांचे बक्षीस 

साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले मित्र समूहाने रुपये एक लाख ७७ हजार ७७७ बक्षिसाची दहीहंडी जवळवाडीच्या ( ता. जावळी) येथील भैरवनाथ गोविंदा पथकाने फोडून बक्षिसाची रक्कम पटकावली. यामध्ये सात गोविंदा पथकांनी सहभाग नोंदवला होता.
साताऱ्यात सगळयांचे आकर्षण ठरलेला खासदार उदयनराजे मित्र समुहाच्यावतीने आयोजित दहीहंडी सोहळयात सगळय़ांच्या नजरा पाच थराची सलामी देवून सहाव्या थराला मटकी फोडून टाकणाऱ्या जवळवाडीकरांच्याकडे वळल्या. साताऱ्यातील तालीम संघाच्या मैदानावर झालेली तुफान गर्दीत उदयनराजेंची एन्ट्री झाल्यापासून ते हंडी फोडेपर्यंत युवक कार्यकर्ते त्यांच्या स्टाईलवर फिदा होते. डॉल्बीच्या तालावर युवक नाचत होते. उदयनराजेंनी नेहमीसारखेच गर्दी पाहून डायलॉग मारले आणि तरुणाईच्या उत्साहाला दाद दिली. यावेळी डॉल्बी चा सर्रास वापर सातरकरांचे लक्ष वेधून गेला.