जगातील ‘ही’ 5 शहरे लवकरच पाण्याखाली जाणार; कारण वाचून तुमचीही चिंता वाढेल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आपण ज्या शहरात राहतो तेच शहर जर पाण्याखाली गेलं तर? नुसत्या विचारानेच अंगावर काटा येतो. परंतु जगभरातील अनेक महत्वाची शहरे समुद्रकिनारी आहेत. समुद्रकिनारी असल्याने या शहरांना कायमचाच धोका राहतो. भारताची आर्थिक राजधानी असलेली मुंबई तर दरवर्षी 2 किलोमीटर समुद्रात जात असल्याचे सर्वेक्षण मागील वर्षी आयआयटी मुंबईने केलं होतं. ही गोष्ट नक्कीच चिंताजनक आहे. जागतिक तापमानवाढ किंवा हवामान बदलाचा हा परिणाम असल्याचे म्हंटल जात असलं तरी फक्त मुंबईच नव्हे तर जगातील अशी इतरही ५ महत्वाची शहरे आहेत ज्यांना समुद्राचा धोका आहे आणि येत्या काही वर्षात ही शहरे पाण्याखाली जाण्याचा अंदाज आहे . चला जाणून घेऊयात नेमकी ही शहरे कोणती याबाबत…..

1 ) जकार्ता (Jakarta) –

10 दशलक्ष लोकसंख्या असलेले जकार्ता हे जगातील सर्वात जलद बुडणारे शहर असल्याचे म्हटले जाते. हाऊ स्टफ वर्क्स वेबसाइटच्या अहवालानुसार, शहराचा 40 टक्के भाग समुद्राखाली बुडाला आहे आणि 2030 पर्यंत हे शहर पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हाच धोका ओळखून इंडोनेशियाने नुसंतारा शहराला आपली नवी राजधानी केली आहे.

2) बँकॉक (Bangkok)

थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये सुमारे 10 दशलक्ष लोक राहतात. अतिशय सुंदर शहर असल्याने दरवर्षी जगभरातून पर्यटक मोठ्या प्रमाणावर बँकॉकला जातात. मात्र याठिकाणी सतावणारी सर्वात मोठी समस्या म्हणजे पूर . जमीन खचल्यामुळे 2050 पर्यंत बँकॉक मधील पुराची समस्या 70 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. त्यामुळे हे शहर सुद्धा पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

3) न्यूयॉर्क (New York)

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराचे नाव तर तुम्ही कायम ऐकतच असाल. जगातील सर्वाधिक लोकप्रिय शहरांपैकी न्यूयॉर्कचे नाव आवर्जून घेतलं जाते. परंतु एका अहवालानुसार, शहर दरवर्षी 1-2 मिलीमीटरने बुडत आहे. न्यूयॉर्क समुद्राची पातळी देखील वाढत आहे ज्यामुळे हे शहर बुडण्याची प्रक्रिया वेगवान होत आहे.आंतरराष्ट्रीय संशोधकांनी अंदाज वर्तवला आहे की सन 2100 पर्यंत जेव्हा जागतिक तापमान 5 °C (9 °F) असेल तेव्हा न्यूयॉर्क येथील परिस्थिती आणखी खराब असेल.

4) व्हेनिस (Venice)

जगातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक असलेल्या इटलीतील व्हेनिस शहराचा देदीप्यमान नजारा तुम्ही इंटरनेट वर तरी नक्कीच पाहिला असेल. या शहराचे वैशिष्ट्य म्हणजे हे शहर पूर्णपणे समुद्रावर उभे आहे. या शहरात रस्त्यांच्या ऐवजी कालवे आहेत ज्यावर लोक बोटिंग देखील करतात. पण हवामानातील बदलामुळे व्हेनिस सुद्धा पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. भूगर्भातील पाण्याचा अतिरेक झाल्यामुळे हे शहर दरवर्षी ०.०८ इंच वेगाने पाण्यात बुडत आहे.

5) ह्युस्टन (Houston) –

अमेरिकेतील आणखी एक शहर ह्युस्टनही येत्या काही वर्षात बुडण्याच्या मार्गावर आहे. टेक्सासमधील या शहरात भूजल मोठ्या प्रमाणात काढण्यात आले, याच अति भूजल उपसण्यामुळे या शहराला मोठा धोका निर्माण झालाय. 1917 पासून शहरातील काही भाग 10 फुटांपर्यंत बुडाला आहे. आता येत्या काळात हे शहर पूर्ण पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झालीये.