पुन्हा ऑपरेशन लोटस!! काँग्रेस आमदारांना भाजपकडून 50 कोटींची ऑफर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपकडून पुन्हा एकदा ऑपरेशन लोटसचा (Operatiion Lotus) प्रयोग सुरु असून काँग्रेस आमदारांना प्रत्येकी ५० कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली आहे असा मोठा दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना सिद्धरामय्या यांनी हा खळबळजनक आरोप भाजपवर केला आहे. मात्र काँग्रेसचा एकही आमदार आम्हाला सोडून जाणार नाही असा विश्वासही सिद्धरामय्या यांनी व्यक्त केला. भाजपने मात्र सिद्धरामय्या यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

सिद्धरामय्या म्हणाले, भाजप लोकसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी दक्षिणेकडील राज्यात ऑपरेशन लोटस चालवण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या वर्षभरापासून माझे सरकार फोडण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरु आहे. कर्नाटकातील काँग्रेसचे आमदार फोडण्यासाठी भाजपने 50 कोटींची ऑफर दिली होती. मात्र त्यांचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. भाजपने कितीही प्रयत्न केले तरी काँग्रेसचा एकही आमदार पक्ष सोडून जाणार नाही, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील कर्नाटक सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल असेही सिद्धरामय्या यांनी सांगितलं.

भाजपने फेटाळले आरोप –

दरम्यान, भाजप खासदार एस प्रकाश यांनी मात्र सिद्धरामय्या यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. केवळ एका घटकाची सहानुभूती मिळवण्यासाठी सिद्धरामय्या वारंवार अशा प्रकरचे आरोप करत आहेत हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे एस प्रकाश यांनी म्हंटल. कर्नाटक सरकारच्या मुद्द्यांवर आणि उपलब्धींवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी सिद्धरामय्या खोटे आरोप करत आहेत, भाजप लोकसभा निवडणुकीत सर्व 28 जागा जिंकण्यावर लक्ष केंद्रित करत आहे, तर सिद्धरामय्या फक्त निवडणुकीनंतर आपला पाय रोवण्यावर भर देत आहेत. असं म्हणत एस प्रकाश यांनी पलटवार केला.