रोहित पवारांना मोठा झटका!! ED कडून बारामती ॲग्रोची 50 कोटींची मालमत्ता जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मनी लाँड्रिंग प्रकरणांमध्ये ईडीने (ED) शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना मोठा झटका दिला आहे. नुकतीचिडी कडून बारामती ॲग्रोच्या (Baramati Agro) संबंधित तब्बल पन्नास कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ईडीने ही कारवाई केल्यानंतर याचा मोठा धक्का रोहित पवार आणि शरद पवार यांना बसला आहे. मुख्य म्हणजे यापूर्वी देखील मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीकडून रोहित पवार यांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आता ईडीने थेट मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, मनी लाँड्रिंग प्रकरणांमध्ये ईडीने बारामती ॲग्रो संबंधित औरंगाबाद येथील कन्नड साखर कारखान्यातील 161.30 एकरची संपत्ती जप्त केली आहे. ही संपत्ती एकूण 50 कोटी रुपयांची असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये जमीन, शुगर प्लांट, इमारत आणि इतर अनेक गोष्टींचा समावेश आहे. ईडीने ही मोठी कारवाई केल्यानंतर याबाबतची माहिती एक्स अकाऊंटवरून देण्यात आली आहे.

आपल्या या पोस्टमध्ये ईडीने म्हटले आहे की, ईडीने कन्नड, औरंगाबाद येथील साखर युनिटची 161.30 एकर जमीन, प्लांट, मशिनरी आणि बिल्डिंग जप्त केली आहे. बारामती अॅग्रोची ही एकूण 50.20 कोटी किंमतीची मालमत्ता ईडीच्या ताब्यात आहे. दरम्यान, यापूर्वी बारामती ॲग्रोच्या गैरव्यवहार प्रकरणांमध्ये ईडीने मुंबईसह 6 ठिकाणी छापेमारी केली होती. बारामती ॲग्रो कंपनीची मालकी रोहित पवार यांच्याकडे असल्यामुळे ईडीकडून रोहित पवार यांची देखील चौकशी करण्यात आली होती. यानंतर आता ईडीने ॲग्रो संबंधित मालमत्ता जप्त केली आहे.