कृष्णा नदीपात्रात पहिलीतील 7 वर्षाच्या मुलाचा बुडून मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वातावरणात उगाड्याचे प्रमाण वाढल्यामुळे ग्रामीण भागात राहणारे शाळकरी मुले दुपारच्यावेळी नदीकाठी पोहण्यासाठी जात आहेत. मात्र, पोहताना बुडण्याच्याही घटना घडत आहेत. अशीच एक घटना कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथे घडली आहे. या गावातील पहिलीत शिकणाऱ्या मुलाचा कृष्णा नदीच्या पात्रात बुडून दुर्दैवी मृत्यूझाला असून शुक्रवारी सायंकाळी हि घटना घडली. अफराज तय्यब सुतार (वय 7) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, अफराज हा त्याच्या मित्राबरोबर कृष्णा नदीच्या काठावर विटी दांडूने खेळत होता. अफराज याच्याकडे वाजवायची शिट्टी होती. शिट्टी नदीपात्रात पडल्याने ती काढत असताना अफराजचा पाय घसरला व तो नदीपात्रात पडला. तो पाण्यात बुडाल्याचा पाहून त्याचे मित्र घाबरले.

मित्रांनी अफराज नदीत पडल्याची माहिती घरी व शेजाऱ्यांनाही सांगितली. लोकांनी नदीकडे धाव घेतली व पाण्यात बुडालेला अफराजला बाहेर काढून उपचारासाठी खासगी हॉस्पिटल हलवण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तो मृत झाल्याचे घोषित केले. या घटनेची नोंद तालुका पोलिस ठाण्यात झाली असून, हवालदार रोहित पाटील तपास करत आहेत.