औरंगाबाद | कुपोषण निर्मूलनासाठी 17 ऑगस्ट पासून अति कुपोषित आणि मध्यम कुपोषित बालकांसाठी विशेष धडक शोध मोहीमेला सुरुवात करण्यात आली. यावेळी शहरात 728 तीव्र कुपोषित बालके महिला बालकल्याण विकास आणि आरोग्य विभाग यांच्या माध्यमातून आढळली आहेत. या मोहिमेसाठी 411 पथके बनवण्यात आले आहे.
आतापर्यंत 1 लाख 14 हजार 590 बालकांचे वजन आणि उंची घेण्यात आली असून यातील 728 बालके हे अति तीव्र कुपोषित असून 3 हजार 982 बालके मध्यम कुपोषित आढळली असून 1 हजार 709 अंगणवाडी केंद्रांचे सर्वेक्षण अजून बाकी आहे. कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव आणि तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता कुपोषित बालकांची संख्या जास्त असून या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर या बालकांवर उपचार करण्यासाठी आणि बालमृत्यू रोखण्यासाठी ही मोहीम प्रभावी आहे. या मोहिमेसाठी काम करणाऱ्या पथकांमध्ये वैद्यकीय अधिकारी अंगणवाडी पर्यवेक्षिका, समुदाय आरोग्य, वैद्यकीय अधिकारी, अंगणवाडी ताई, आशा कार्यकर्ती आणि एएनएम, मदतनीस यांचा समावेश असून दहा दिवस ही मोहीम राबवण्यात येणार आहे.
तीव्र कुपोषित आढळलेल्या बालकांवर बाल ग्राम केंद्रात उपचार सुरू असून त्यांना पोषण पुनर्वसन केंद्रांमध्ये तीन महिने दाखल करण्यात येणार आहे. यामध्ये अंगणवाडी सेविका घराघरात जाऊन बालकांची पाहणी करत आहेत.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका पाहता जास्तीत जास्त बालकांचे सर्वेक्षण होणे गरजेचे आहे असे महिला आणि बालविकास अधिकारी प्रसाद मिरकले यांनी सांगितले.




