हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| तुम्ही जर Air India Express ने हवाई प्रवास करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण की, गेल्या 24 तासांमध्ये Air India Express कडून तब्बल 78 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. कंपनीतील तब्बल 300 कर्मचाऱ्यांनी आजारपणाचे कारण सांगत सामूहिक सुट्टी घेतल्यावर एअर इंडियाला हा निर्णय घ्यावा लागला आहे. याचं कारणामुळे एअर इंडियाची काही उड्डाणे उशिरा सुरु होणार आहेत.
Air India Express ची विमान सेवा खोळंबली
मिळालेल्या माहितीनुसार, Air India Express च्या कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या व्यवस्थापनावर असहमती व्यक्त करण्यासाठी सामूहिकरित्या आजारपत्र दाखल केले आहे. यामध्ये एकूण 300 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. थोडक्यात सांगायचे झालेच तर, Air Asia आणि Air India Express यांच्या विलीनीकरणाच्या प्रक्रियेला विरोध दर्शवण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून हे ठोस पाऊल करण्यात आले आहे.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने 2023 मध्ये टाटा समूहाची बजेट एअरलाइन Air Asia आणि Air India Express यांच्या विलीनीकरणास मान्यता दिली होती. परंतु याला केबिन क्रूसह वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. तसेच, कंपनीचे व्यवस्थापन चुकीचे आहे, कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांशी समानतेने वागत नाही असा आरोप ही कर्मचाऱ्यांकडून लावण्यात आला. या कर्मचाऱ्यांमध्ये जुन्या कर्मचाऱ्यांचा सर्वात जास्त समावेश असून ते 300 कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधीत्व करतात.
कंपनीने काय म्हटले आहे??
याबाबत प्रतिक्रिया देत Air India Express ने म्हटले आहे की, “मंगळवारी आमच्या केबिन क्रूचा एक भाग आजारी रजेवर गेला आहे. यामुळे अनेक फ्लाइट्सना विलंब होत आहे आणि अनेक फ्लाइट्स रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्वात प्रथम आम्ही आमच्या विमान प्रवाशांची झालेल्या गैरसोयीबद्दल माफी मागतो.”