स्वराज्य’ शिक्षण संस्थेच्या ‘सहयोग’ या विशेष मुलांच्या (दिव्यांग) शाळेचा सातवा वर्धापनदिन रविवारी उत्साहात पार पडला. दिव्यांग विद्यार्थ्यांचं स्नेहसंमेलन, सामाजिक कार्यात ठसा उमटवलेल्या दिव्यांग बांधवांचा आणि सहकाऱ्यांचा सन्मान तसेच दिव्यांग मुलांच्या पालकांवर कौतुकाची थाप असं या कार्यक्रमाचं स्वरूप होतं. पुणे, सातारा, नाशिक जिल्ह्यातील सहयोग परिवाराचे सदस्य या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वराज्य शिक्षण संस्थेच्या प्रमुख सौ पुष्पांजली मराठे यांनी २०१८ साली दिव्यांग मुलांसाठी हक्काचं ठिकाण तयार व्हावं या उदात्त हेतूने सहयोग या विशेष मुलांच्या शाळेची सुरुवात केली. या कामी त्यांचे पती प्रकाश मराठे यांचं त्यांना मोलाचं सहकार्य मिळालं. एका दिव्यांग विद्यार्थ्यांपासून सुरू झालेला हा प्रवास आज २० विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे. या शाळेत प्रवेश घेण्यासाठी आणखीही १५ विद्यार्थी प्रतीक्षायादीत असल्याची माहिती संस्थेच्या संचालिका पुष्पांजली मराठे यांनी दिली. वर्धापनदिन आणि स्नेहसंमेलन कार्यक्रमासाठी मोशीतील जाणीव परिवाराचे अध्यक्ष रामचंद्र सावंत, सचिव अर्जुन आल्हाट, अंकुर ट्रस्टच्या डॉ ज्योती चौधरी आणि स्वराज्य शिक्षण संस्थेचे संचालक-मार्गदर्शक राजेश घुमटकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात लोणावळा येथील आधारस्तंभ दिव्यांग फाउंडेशनच्या प्रमुख मयुरी बोत्रे आणि राजगुरूनगर येथील रुद्र शिवा एंटरप्रायजेसचे रुद्र रावत यांचा विशेष सत्कार करण्यात आला. मयुरी बोत्रे या स्वतः दिव्यांग असून परिस्थितीचा बाऊ न करता त्यांनी स्वतःचं शिक्षण पूर्ण करत दिव्यांग बांधवांसाठी काम सुरू केलं. मागील चार वर्षांत त्यांच्या सहकार्यातून तीसहून अधिक दिव्यांग बांधवांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. रुद्र रावत यांनीही अनाथाश्रमात आपल्या आयुष्याचा बराच काळ व्यतीत केला असून सहयोग संस्थेसाठी ते वेळोवेळी सहकार्य करत असतात. दोघांच्या या कार्याचा यथोचित सन्मान सहयोग संस्थेमार्फत करण्यात आला.
दिव्यांग मुलांना वाढवण्यात येणाऱ्या अडचणींची जाणीव ठेवून पालकांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचं कामही कार्यक्रमात करण्यात आलं. दरवर्षी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या मातांना पुरस्कार दिला जात होता. यंदा मात्र विद्यार्थ्यांच्या वडिलांना पुरस्कार देत त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यामध्ये दत्तात्रय पुरी, अवधूत धाडगे, हेमंत करमारे, अरविंद भारमळ, छाया भारमळ यांना आदर्श पालक पुरस्कार देण्यात आला. सहयोगमध्ये सेवाकार्य करणाऱ्या सहशिक्षिका स्वाती बेल्हेकर आणि मावशी सारिका थिगळे यांचाही कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.
स्नेहसंमेलनात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यामध्ये आदित्य कुदळे, अभिषेक पाणमंद, विराज शिंदे, श्लोक घाडगे, समृद्धी डोळस, दुर्वा आगकर, समीर सुकाळे, अथर्व पुरी, माऊली पुरी, देवांक दांगट, ईश्वरी गोसावी, वरद करमारे, सानिका भुते, सत्यम पवळे, प्रशिक लहुपचांग, देवांश थोरात, श्रावणी पोखरकर यांचा समावेश आहे. डिसेंबर महिन्यात जागतिक अपंग दिन आणि अपंग सप्ताहानिमित्त या विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना यावेळी पारितोषिकही देण्यात आली. समृद्धी डोळस हिने गौतमी पाटीलच्या वेशभूषेत केलेल्या नृत्याला प्रेक्षकांनी चांगलीच दाद दिली. याशिवाय बम बम बोले, पोलिसवाल्या सायकलवाल्या, ओम साई राम या गाण्यावर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्यालाही उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांनी सहयोग संस्थेच्या वाटचालीबद्दल समाधान व्यक्त केलं. रांजणगाव येथील विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळाचे निलेश काळे, शिरूर येथील सामाजिक कार्यकर्ते विशाल घावटे, उपशिक्षणाधिकारी अजय ढाणे यांनी संस्थेला आर्थिक मदत करत आपली कृतज्ञता व्यक्त केली. नील हॉटेल या कार्यक्रमठिकाणची व्यवस्था पाहण्याचं श्री कासवा यांनी केलं. कार्यक्रमाचं नेटकं आणि सुरेख सूत्रसंचालन कांचन गडाख यांनी केलं. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शीतल राऊत आणि इतर सहकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.
थोडक्यात पण महत्त्वाचं – सहयोग संस्थेला दानशूर लोकांच्या मदतीची गरज आहे. मागील सात वर्षांत अनेक अडचणींचा सामना करत वीस दिव्यांग विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आनंद भरण्याचं काम संस्थेने केलं आहे. दिव्यांग मुलांसाठी शाळा उभारणीचं काम पुष्पांजली मराठे आणि सहकारी करत असून कोणत्याही स्वरूपाच्या मदतीसाठी त्यांना 8805528355 या क्रमांकावर तुम्ही संपर्क करू शकता.