टीम, HELLO महाराष्ट्र | ”आपल्या यशाची पाऊले जर भक्कम असतील तर आपण नेहमीच अपयशाच्या दोन पाऊले पुढे असू” हे शब्द आहेत जगप्रसिद्ध महान शास्त्रज्ञ आणि भारताचे माजी राष्ट्रपती ‘डॉ. एपीजे अब्दुल कलाम’ यांचे. आपल्या प्रेरणादायी आयुष्याने आणि अलौकिक व्यक्तिमत्वाने त्यांनी कोटयावधी युवक आणि नागरिकांच्या मनामध्ये स्थान मिळवले आहे. देशाचे ‘मिसाईल मॅन’ अशी ओळख असलेल्या अब्दुल कलाम यांचा आज ८८ व जन्मदिवस. जगभरासहित देशभरातून त्यांना आज श्रद्धांजली दिली जात आहे.
भारताचे ११ वे राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्म १ ऑक्टोम्बर १९३१ रोजी रामेश्वरम, तामिळनाडू येथे झाला. लहानपणी अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये त्यांचे आयुष्य गेले. त्यांचे थोरले बंधऊ मुस्तफा हे किराणा मालाचे दुकान् चालवीत तर लहान बंधू शंख शिंपल्या पासून बनवलेल्या वस्तू यात्रेकरुंना विकत. वडिल जैनुल्लाब्दीन आणि आई आशीअम्मा हे दोघेही सहृदयी माता पिता त्यांना लाभले. खडतर परिस्थिती असली तरी देखील त्यांना शिक्षणाची ओढ बसू देत नव्हती. प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी भौतिकशास्त्र आणि एरोस्पेस अभियांत्रिकीची पदवी हस्तगत केली. पुढे त्यांनी संरक्षण संशोधन, विकास संघटना आणि भारतीय अंतरिक्ष संशोधन संघटनेत वैज्ञानिक म्हणून ४० वर्षे आयुष्य व्यतीत केले. १९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील पीएसएलव्ही (सॅटेलाईट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात ते सहभागी झाले.
इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला. त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा ‘डीआरडीओ’मध्ये सहभागी झाले. सहकाऱ्यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये होती. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील ‘अग्नी’ क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली. विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता. डॉ. कलाम हे अविवाहित व पूर्ण शाकाहारी होते. बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते.
२००२ मध्ये कलाम हे भारताचे ११ वे राष्ट्रपती आणि भारतातील सर्वात प्रेमळ व्यक्तिमत्त्व बनले, त्यांना ‘पीपल्स प्रेसिडेंट’ म्हणूनही मान्यता मिळाली. त्यांनी एकदा सांगितले होते की, ”त्यांच्या कार्यकालात प्रॉफिट बिल ऑफिसवर घेण्यात आलेले निर्णय सर्वात कठीण होते. आपल्या कार्यकाळात त्यांना सादर केलेल्या २१ दया याचिकांपैकी २० याचिका त्यांनी फेटाळून लावल्यामुळे कलाम यांंच्यावर टीका झाली होती. कलाम यांनी पाच वर्षांच्या कार्यकाळात बलात्कार करणाऱ्या धनंजय चॅटर्जी यांच्या दया याचिकेस देखील नकार दिला होता. तसेच त्यांनी २००५ मध्ये बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा वादग्रस्त निर्णय घेतला. सप्टेंबर २००३ मध्ये पीजीआय चंदिगढ मधील परस्पर संवादात कलाम यांनी देशातील लोकसंख्या लक्षात घेऊन भारतामध्ये देखील ‘समान नागरी कायदा’ असण्याच्यी आवश्यकता प्रतिपादित केली होती. कलाम यांचा कार्यकाळ २५ जुलै २००२ पासून ते २५ जुलै २००७ पर्यंत राहिला. देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ तसेच दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘पद्म विभूषण’ आणि सोबतच ‘पदमभूषण’ यांसह असंख्य पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. तसेच वर्ष २००५ मध्ये बंगालच्या उपसागरात ओरिसाच्या किनाऱ्याजवळ असलेल्या व्हीलर आयलंडचे प्रचलित नाव बदलून ते अब्दुल कलाम बेट असे करण्यात आले.
कलाम यांनी कारकिर्दीमध्ये लिहिलेली पुस्तके देखील कायम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली. यामध्ये इग्नायटेड माइंड्स: अनलीशिंग द पॉवर विदिन इंडिया, इंडिया – माय-ड्रीम, एनव्हिजनिंग ॲन एम्पॉवर्ड नेशन, टार्गेट ३ मिलियन इ. काही महत्वाची पुस्तके आहेत. मात्र यामध्ये ‘इंडिया २०२० – ए व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम’ या पुस्तकाची जगभर चर्चा झाली. त्यांच्या आयुष्यावर लिहिले गेलेले ‘विंग्ज ऑफ फायर’ (मराठी अनुवाद – अग्निपंख) हे आत्मचरित्र कायमच तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. कलाम यांचे २७ जुलै २०१५ रोजी विद्यार्थ्यांना व्याख्यान देताना आयआयएम शिलॉंग येथे निधन झाले. त्यांचे निधन म्हणजे भारतासाठी आणि वैज्ञानिक जगतासाठी कधीही न भरून येणारे नुकसान आहे असे सांगण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र नोदी यांनी त्यांचे वर्णन “आश्चर्यकारक प्रेरक” आणि ‘एक महान अध्यक्ष’ म्हणून केले आहे. “एक अपवादात्मक शिक्षक, एक अद्भुत प्रेरक, एक उत्कृष्ट वैज्ञानिक आणि एक महान राष्ट्रपती प्रत्येक भारतीयांच्या मनामध्ये आणि विचारांमध्ये चिरतरुण राहील हीच त्यांना श्रद्धांजली”