9 तासांच्या चौकशीनंतर रोहित पवार ईडी कार्यालयातून बाहेर; म्हणाले, लोकशाहीचा आवाज दाबला..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गुरुवारी संपूर्ण दिवसभर शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची ईडीकडून (ED)चौकशी करण्यात आली आहे. ही चौकशी तब्बल नऊ तास सुरू होती. यापूर्वी देखील 24 जानेवारी रोजी रोहित पवारांची 11 तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर गुरुवारी पुन्हा एकदा बारामती ऍग्रो प्रकरणावर त्यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली. प्रदीर्घ झालेल्या चौकशीनंतर रोहित पवार संध्याकाळी ईडी कार्यालयातून बाहेर पडले. यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. त्याचबरोबर, रोहित पवारांना खांद्यावर उचलून घेतले.

दिवसभर झालेल्या ईडी चौकशीनंतर रोहित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना, “देशात आणि महाराष्ट्रात जे काही चुकीचं चालू आहे, लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, तपास यंत्रणांच्या माध्यमातून दबाव आणण्याचा प्रयत्न होतोय. त्याला विरोध करण्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते उपोषण करत आहेत. त्यांना मी विनंती करण्यासाठी महाराष्ट्राच्या वतीने तुमचे आभार व्यक्त करतो. या सर्वांनी त्यांचे उपोषण मागे घ्यावे” अशी विनंती रोहित पवारांनी केली.

त्याचबरोबर, “8 तारखेला पुन्हा कागदपत्र देण्यास ईडी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. त्यानंतर गरज भासल्यास ईडीकडून बोलवलं जाणार आहे आम्ही पळून जाणारे नाही, सत्तेत बसलेल्या लोकांनी हे लक्षात ठेवावं.” अशी माहिती रोहित पवारांनी दिली. तसेच, “नागरीक, कार्यकर्ते, पदाधिकारी यांचं या राजकारणाशी काही देणंघेणं नसताना ते सामान्य लोकांचे प्रश्न घेऊन लढले. कलेक्टर, तहसीलदारांना भेटले, त्यांनी आंदोलन केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो की जनतेचा आवाज त्यांनी शासनापर्यंत पोहोचवला” असे रोहित पवार म्हणाले.

दरम्यान, 24 जानेवारी रोजी 25 हजार कोटींच्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याशी संबंधित असणाऱ्या मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने रोहित पवारांची चौकशी केली होती. ही चौकशी तब्बल 11 तास सुरू होते. ईडीने मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या गुन्हाच्या आधारावर ही चौकशी सुरू केली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा रोहित पवारांना चौकशीसाठी बोलवण्यात आले होते.