हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Samruddhi Mahamarg । मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर सातत्याने अपघाताच्या घटना समोर येत असतात. आत्तापर्यंत हा महामार्ग सुरु झाल्यापासून हजारो लोकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. अपघाताची कारणे जरी वेगवेगळी असली तरी सततच्या अपघातांमुळे समृद्धी महामार्ग नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी राहिला आहे. आता या महामार्गावर अपघात झाल्यावर तात्काळ मदत आणि उपचार मिळावेत यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. समृद्धी महामार्गावर ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यात येणार आहे आणि एअर ॲम्बुलन्स सेवा पुरवणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी विधान परिषदेत याबाबत माहिती दिली. नागपूर – मुंबई हा ७०१ किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग विदर्भ मराठवाड्याला समृद्ध करणारा महत्त्वाचा महामार्ग (Samruddhi Mahamarg) आहे. या महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाने आवश्यक उपाययोजना करण्यास सर्वोच्य प्राधान्य दिले आहे. समृद्धी महामार्गावर सध्या 22 ठिकाणी इंधन स्थानके आणि स्नॅक्स सेंटर स्वच्छतागृहासह कार्यरत आहेत. या व्यतिरिक्त महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून 21 ठिकाणी प्रत्येकी 20 असे एकूण 420 एफआरपी स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याची देखभाल व स्वच्छता करण्यासाठी स्वतंत्र कंत्राटदार नेमण्यात आले आहेत.
एअर ॲम्बुलन्स सेवा सुरू करण्याचे विचाराधीन Samruddhi Mahamarg
मुंबई समृद्धी महामार्गावर अपघातग्रस्तांना तातडीने मदत व उपचार मिळावेत यासाठी महामार्गावर ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यात येणार आहे. तसेच अपघातग्रस्तांना त्वरित वैद्यकीय मदत मिळावी यासाठी नागपूर ते मुंबईदरम्यानच्या मल्टिस्पेशालिटी रुग्णालयांमार्फत वैद्यकीय सुविधा पुरविल्या जाणार आहेत. तसेच महत्वाचं म्हणजे या महामार्गावर एअर ॲम्बुलन्स सेवा सुरू करण्याचे विचाराधीन असल्याची माहिती मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी विधान परिषदेत दिली. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ इत्यादींना अपघातांची / इतर घटनांची सूचना देण्यात येते. जेणेकरून घटनास्थळी जलदगतीने मदत पोहोचविणे सोयीचे होते. प्रवाशांना तातडीने मदत मिळण्याकरिता महामार्गावर हेल्पलाईन नंबरचे फलक लावण्यात आले आहेत. याशिवाय, समृद्धी महामार्गावर घटना व्यवस्थापन ( Incident Management) सुरळीत होण्याच्या अनुषंगाने स्टॅण्डर्ड आपरेटिंग प्रोसिजर ( SOP) तयार केलेली असून त्याचप्रमाणे घटना व्यवस्थापन प्रतिसाद प्रणाली मार्फत कामकाज पाहिले जाते.










