रिल्सचा नाद जीवावर बेतला; रेल्वेच्या धडकेत 14 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या सोशलमीडियावर रिल्सचे प्रमाण अधिक वाढले आहे. लोकांचे मनोरंजन करणे व अधिक आत्मविश्वास बाळगून जीवावर बेततील असे स्टंट करणे हा जणू काही ट्रेंडच झाला आहे. ह्यामुळे अनेकजणांनी आपला जीव देखील गमवला आहे. अशीच एक घटना उत्तर प्रदेश मधील बरबंकी मध्ये घडली आहे.उत्तर प्रदेश मध्ये राहणाऱ्या 14 वर्षाचा फरमान गुरुवारी आपल्या काही मित्रांसोबत शहापूर शहरातील बारावफत मिरवणुकीमध्ये गेला होता. त्याचवेळी तेथील दामोदरपूर गावाजवळच्या रेल्वे रुळावर फरमान आपल्या मित्रांसोबत रिल्स काढत असताना अचानक आलेल्या दरभंगा एक्सप्रेस ट्रेनने त्याला उडवले आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

30 सेकंदाच्या व्हिडीओने घेतला बळी

ही घटना गुरुवारी घडली मात्र त्याचे व्हिडीओ ऑनलाईन शनिवारी पोस्ट करण्यात आले. स्लो मोशन मध्ये रिल काढता यावी यासाठी फरमान रुळावरून चालत होता. 30 सेंकदाचा व्हिडीओ बनवण्यासाठी तो रेल्वे ट्रॅकवर गेला मात्र परत आलाच नाही. फरमानच्या मृत्यूचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये स्पष्ट दिसून येत आहे की, पाठीमागून येणारी दरभंगा एक्सप्रेस हॉर्न देत होती. मात्र फरमान त्याचा व्हिडीओ काढण्यात मग्न असल्यामुळे त्याला ट्रेन आल्याचं समजलं नाही. आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

रेल्वे पोलीस करतायेत तपास

जहांगीराबाद भागातील तेरा दौलतपूर गावचा राहणाऱ्या फरमानला पहिल्यापासूनच रिल्स आणि फोटोज काढण्याची आवड होती. मात्र ह्याच आवडीने त्याचा जीव घेतला. फरमानच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. आणि त्याचे पोस्टमार्टम करण्यात आले. ज्याठिकाणी त्याचा मृत्यू झाला त्याठिकाणी त्याचे मित्र सोबत असल्यामुळे त्यांचीही पोलीस चौकशी करत आहेत. पोस्टमार्टम केल्यानंतर पोलिसांनी मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला.