व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

घृणास्पद!! सामूहिक बलात्कारानंतर मुलीची हत्या करून कोळशाच्या भट्टीत जाळले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राजस्थान येथील भीलवाडा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी, गावातील भट्टीजवळ मुलीची चप्पल सापडल्यानंतर परिसरात गोंधळ उडाला. यानंतर 15 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिला कोळशाच्या भट्टीत टाकून जाळण्यात आल्याचे उघडकीस आले. सध्या या घटनेचा भीलवाडा पोलीस तपास करीत आहेत. भिलवाडा एसपी आदर्श सिद्धू यांनी सांगितले की, मुलीची हत्या आणि जाळल्याची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आले. यानंतर घटनास्थळी जाऊन प्राथमिक तपास करण्यात आला. या 15 वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याचे नाकारता येणार नाही. याप्रकरणी आम्ही चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. आम्हाला लवकरच आरोपींविरोधात पुरावे देखील सापडतील.

नेमके प्रकरण काय आहे?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोटरी परिसरातील नरसिंगपुरा गावातील पीडित मुलगी बुधवारी सकाळी आपल्या आईसोबत शेतात शेळ्या चरण्यासाठी गेली होती. दुपारी तिची आई घरी परतली होती. मात्र मुलगी घरी आली नाही. बराच वेळ होऊनही ती न परतल्याने नातेवाईकांनी गावात जाऊन तिचा शोध घेण्यास सुरूवात केली. परंतु तरी देखील ती कुठेच सापडली नाही. काही अंतरावर गेल्यानंतर गावकऱ्यांना जंगलाजवळ कोळशाची भट्टी जळत असल्याची दिसली. यानंतर सर्वांनी जवळ जाऊन पाहिले तर त्या ठिकाणी मुलीच्या हातातील कडे आणि चप्पल सापडली. गावकऱ्यांनी जेव्हा भट्टी खोलून पाहिली तेव्हा त्यात काहीतरी जळत असल्याचे दिसले. जेव्हा सर्व लाकडे बाहेर काढण्यात आली तेव्हा त्यांना राखेत हाडे मिळाली. यातूनच ही पीडित मुलगीच असल्याचं सिद्ध झाले.

आता या घटनेमुळे गावात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. या घटनेबाबत भाजपने गेहलोत सरकारला घेरले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी यांनी ट्विट करत म्हणले आहे की, भीलवाडा येथे एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर आरोपींनी तिला कोळशाच्या भट्टीत जाळून टाकले आहे. हे प्रशासनाचे अपयश पहा. याप्रकरणी पोलिसांकडून कोणतेही सहकार्य न झाल्याने कुटुंबीयांनी स्वत: तपास करून मृत मुलगी शोधून काढली. गेहलोत सरकार महिलांच्या सुरक्षेतेबाबत दुसऱ्या राज्यांना नावे ठेवत आहे मात्र ते आपल्या राज्यातील गुन्हे थांबवू शकत नाहीत.