GBS Virus| महाराष्ट्रामध्ये गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) या आजाराचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आता GBS रुग्णांची संख्या 200 च्या वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. चिंताजनक बाब म्हणजे, या आजारामुळे पुणे जिल्ह्यातील एका तरुणीनेने आपला जीव गमावला आहे. ही तरुणी मुळची बारामती येथील असून किरण राजेंद्र देशमुख (Kiran Rajendra Deshmukh) वय वर्ष 22 असे तिचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किरण देशमुख ही शिक्षणाच्या निमित्ताने पुण्यात सिंहगड परिसरातील नातेवाईकांकडे राहत होती. परंतु अचानक तिला अशक्तपणा, पोटदुखी आणि जुलाब होऊ लागले. यामुळे तिने कुटुंबीयांकडे जाण्याचा निर्णय घेतला. पुढे, प्रकृती अधिक बिघडल्याने तिच्यावर बारामतीत प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र, लक्षणे गंभीर असल्याने तिला तातडीने पुण्यात हलवण्यात आले. किरणवर 27 जानेवारीपासून उपचार सुरू होते. मात्र काल तब्येत अती बिघडल्यामुळे तिचा मृत्यू झाला.
GBS Virus म्हणजे नेमके काय?
GBS हा एक दुर्मिळ परंतु गंभीर ऑटोइम्यून डिसऑर्डर आहे. या आजारात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती स्वतःच्या मज्जासंस्थेवर हल्ला करते. त्यामुळे स्नायू कमकुवत होतात. काही रुग्णांमध्ये अर्धांगवायूची लक्षणेही दिसून येतात. हा आजार बहुधा कॅम्पिलोबॅक्टर जीवाणू संसर्गानंतर दिसून येतो.
GBS Virus संसर्गाची लक्षणे कोणती?
अतिसार
पोटदुखी
ताप
मळमळ किंवा उलट्या
हात-पायातील अशक्तपणा
सुन्नपणा
सावधगिरी आणि प्रतिबंधात्मक उपाय
पाणी उकळून व गाळून प्यावे.
उघड्यावरचे व शिळे अन्न खाणे टाळावे.
अचानक स्नायूंमध्ये अशक्तपणा वाटल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
दरम्यान, पुणे शहरातील सिंहगड परिसरात रुग्णसंख्या अधिक आहे. त्यामुळे पुणे शहर आणि आजूबाजूतील परिसरात प्रशासनाकडून योग्य उपाययोजना राबविल्या जात आहेत. तसेचं, नागरिकांना काळजी घेण्याचे आव्हाहन करण्यात आले आहे. आता या तरुणीच्या मृत्यूमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.