सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
साताऱ्यातील किल्ले अजिंक्यताऱ्यावरून 64 वर्षीय व्यक्ती दरीत कोसळला असल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. हणमंत जाधव असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. काल संध्याकाळच्या सुमारास फिरण्यासाठी गेलेला व्यक्ती पाय घसरल्याने दरीत कोसळले होते. याबाबतची माहिती आज शनिवारी सकाळी समजल्यानंतर शिवेंद्रराजे रेस्क्यू टीम मदतीला पोहचली आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, अजिंक्यतारा किल्यावर हनुमंत जाधव हे फिरायला गेले होते. यावेळी त्यांचा पाय घसरल्याने ते दरीत कोसळले असल्याचे समजत आहे. आज पहाटे किल्यावर आलेल्या काही लोकांना दरीत कोणीतरी व्यक्ती पडल्याचे दिसून आले. संपूर्ण रात्र आणि 12 तासाहून अधिक काळ हणमंत जाधव दरीत अडकून पडले होते.
याबाबतची माहिती आज सकाळी उघडकीस आल्यानंतर घटनास्थळी सातारा पोलीस दाखल झाले. पोलिसांनी 64 वर्षीय व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी अडचण निर्माण होत होती. त्यामुळे शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमच्या मदतीने संबंधित व्यक्तीला दरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.