राज्यात निवडणुकांचं बिगुल वाजलं!! निवडणूक आयोगाने केली मोठी घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पुढील काही महिन्यांमध्येच आगामी लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यानंतर लगेचच विधानसभा निवडणुका देखील पार पडतील. मात्र या दोन्ही निवडणुकांपूर्वी राज्यात आणखीन एक महत्त्वाची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडून नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, येत्या 5 नोव्हेंबर रोजी राज्यभरातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि 2 हजार 950 सदस्यपदाच्या तसेच 130 सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी मतदान होणार आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि पोटनिवणुकांसाठी मतदान होणार आहे. याबाबतची माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिला आहे. मदान यांनी म्हणले आहे की, आजपासून संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. संबंधित उमेदवारांना नामनिर्देशनपत्रे 16 ते 20 ऑक्टोबर दरम्यान दाखल करता येणार आहेत. त्यानंतर नामनिर्देशनपत्रांची छाननी 23 ऑक्टोबर रोजी करण्यात येईल. नामनिर्देशनपत्रे 25 ऑक्टोबरपर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल.

त्याचबरोबर, येत्या 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडेल. पुढे मतमोजणी 6 नोव्हेंबर रोजी होईल. मात्र गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त भागात सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. याठिकाणी 7 नोव्हेंबर 2023 रोजी मतमोजणी होईल” अशी माहिती यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे. यंदा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी होणारी ग्रामपंचायत निवडणूक तितकीच महत्त्वाची ठरणार आहे.

दरम्यान, राज्यात निवडणुकीचे बिगुल वाजल्यामुळे सर्वच पक्षांनी आपली कंबर कसली आहे. यामध्ये, शिवसेनेचे दोन्ही गट तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट यांच्याकडून देखील जोरदार तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. या सगळ्यांना आगामी निवडणुकीत टक्कर देण्यासाठी भाजपने देखील आपली रणनीती आखली आहे. तर दुसरीकडे राज्यातील विरोधी पक्षांनी देखील एकजूट होत इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये घडणाऱ्या घडामोडी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत.