विट्यात व्यावसायिकाच्या कुटुंबाला तलवारीचा धाक दाखवत दरोडा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली | विटा शहरातील साळशिंगे रस्त्यावरील एका बंगल्यात सशस्त्र दरोडा टाकण्यात आला आहे. यात दरोडेखोरांनी सोने-चांदीच्या दागिन्यासह रोख सुमारे 1 लाख 45 हजार 750 रूपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. ही घटना आज गुरुवारी (दि. 25) रोजी पहाटेच्या सुमारास घडली. दरम्यान, विटा पोलिसांनी तात्काळ श्वानपथक मागवून तपास सुरू केला आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, विटा येथील धान्य व्यापारी रामचंद्र प्रकाश गिड्डे (वय- ३०) यांचे दुकान मायणी रस्त्यालगत शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. तर त्यांचा बंगला येथील साळशिंगे रस्त्यालगत भरवस्तीत आहे. पहाटे साडेतीन वाजल्यानंतर गिड्डे कुटुंबीय झोपेत असताना चार ते पाच अज्ञात दरोडेखोरांनी कटावणीने कुलूप तोडून आत प्रवेश केला. मात्र, यादरम्यान गिड्डे कुटुंबियाना याबाबतची चाहूल लागताच ते झोपेतून जागे झाले. त्यांना घरात अज्ञात व्यक्ती शिरून चोरीचा प्रयत्न करत असल्याचे समजले. यानंतर आरडाओरडा करण्याचा प्रयत्न करताच गिड्डे, त्यांची पत्नी व मुलांना अज्ञातांनी तलवारी आणि चाकूचा धाक दाखवून 29 हजार रुपये रोख रकमेसह सोने- चांदीचे दागिने असा एकूण सुमारे 1 लाख 45 हजार 750 रूपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला. त्यानंतर काही वेळातच या घटनेची माहिती त्यांनी विटा पोलिसांना दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधिक्षक पद्मा कदम, पोलीस निरीक्षक संतोष डोके, उपनिरीक्षक पांडूरंग कण्हेरे यांच्यासह पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान दुपारी सांगलीहून एक श्वानपथक पाचारण करण्यात आले. पुढील तपास विटा पोलीस अधिक तपास करीत आहेत.