देशाची संस्कृती काही निवडणुकांमुळे आणि 2-4 लोकांमुळे संपू शकत नाही; जावेद अख्तरांच परखड भाष्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आपल्या देशाची हजारो वर्षांची संस्कृती काही निवडणुकांमुळे आणि दोन-चार लोकांमुळे संपू शकत नाही. ती चालत आहे आणि कायम चालत राहील. या देशाचा एक आत्मा आहे, ज्याला कोणीही मारू शकत नाही. आणि हाच जिवंत असलेला आत्मा म्हणजे खरा हिंदुस्थान असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ गीतकार व संवादलेखक पद्मभूषण जावेद अख्तर यांनी नवव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात केले.

जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या या महोत्सवात जावेद अख्तर यांची तरुण निर्माता-दिग्दर्शक जयप्रद देसाई यांनी प्रकट मुलाखत घेतली. त्यावेळी अख्तर बोलत होते. प्रसिध्द हिंदी चित्रपट दिग्दर्शक अनुभव सिन्हा, संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, महोत्सवाचे संचालक अशोक राणे, कलात्मक संचालक चंद्रकांत कुलकर्णी, संयोजक नीलेश राऊत, कवी गीतकार दासू वैद्य आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

सामान्य लोकांचं भलं करण्याचा आव..

जावेद अख्तर म्हणाले की, “आपला समाज सध्या एका वळणावर उभा आहे आणि तिथून पुढे काय असणार आहे हे नीट दिसत नाही आहे. समाजवादी काळात सामान्य लोकांचं भलं करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. ते काही प्रमाणात पूर्ण झालं, काही नाही झालं. त्यानंतर आर्थिक उदारमतवाद आला. तिथेही लोकांचं भलं करण्यासाठी काही योजना आणण्यात आल्या. सामान्य लोकांचं भलं करण्याचा आव त्यात आणला गेला असला तरी त्यात हाव आणि व्यक्तीवादच बोकाळला गेला. प्रत्येकजण आपला स्वार्थ शोधतोय. मला हे समजत नाही की मी स्वतःसाठी कितपत जगतोय, माझ्या माणसांसाठी किती जगतोय? समाजासाठी, देशासाठी किती जगतोय? यातून समाज गोंधळला आहे”

समाजातच चांगला कंटेंट नसेल तर..

त्याचबरोबर भारतीय चित्रपट जगताविषयी बोलताना “पन्नास-साठ-सत्तरच्या दशकातील चित्रपट कोणत्याही दर्जाचे असोत, पण त्यांचे हिरो हे सामान्य कामकरी लोकच होते. सध्याच्या चित्रपटातील हिरो हे श्रीमंत कुटुंबातील असतात. हिंदी चित्रपट हे समाजाच्या एकत्रित स्वप्नांतून तयार होतात. आजचे चित्रपट आजच्या समाजाचं प्रतिनिधित्व करत आहेत. आजच्या सिनेमातील खलनायक हा स्पष्ट नाही, कारण नायकच क्लियर नाही. समाजातच चांगला कंटेंट नसेल तर चित्रपटातही तो येणार नाही. अनुभव सिन्हा यांचा ‘आर्टीकल १५’ हा मागील तीन-चार दशकांतील सर्वोत्तम चित्रपट आहे” अशा शब्दात जावेद अख्तर यांनी कौतुक केले.

इतकेच नव्हे तर सेंसरशिपविषयी बोलताना ते म्हणाले की, “प्रत्येक विचारी गीतकार, लेखक हा सेल्फ सेंसरशिप करत असतोच. ती असायला हवीच. पण सरकार नाराज होईल, कोणी धर्मांध व्यक्ती माझ्यावर नाराज होईल म्हणून जर कोणी काही लिहित नसेल तर ते योग्य नाही. सेल्फ सेंसरशिपमुळे स्वतःची मूल्ये बदलली जायला नको. आपलं म्हणणं मांडायलाच हवं, मग ते शब्द कसे हवेत त्याचा प्रत्येकानं विचार करायला पाहिजे”

तसेच, “या जगात जे काही होते त्या पाठीमागे अर्थशास्त्र असते. हिंदुस्थान हा श्रीमंत देश असून त्याने खूप प्रगती केली आहे असे आपल्याला सांगितले जाते. आणि त्याबरोबर आपल्याला हेही सांगितले जाते की, या देशातील ८० कोटी नागरिकांना ५ किलो अन्नधान्य द्यावे लागते. ही कसली प्रगती आहे, विकास आहे” असा प्रश्न अख्तर यांनी उपस्थित केला.

वेरुळविषयी भाष्य

दरम्यान, “वेरुळला मी आज पहिल्यांदा गेलो. हे सगळे वैभव पाहून मी मनापासून भारावलो. हा अनुभव खूप वेगळा होता. मला विचार पडला की, हे काम कोणी केलं असेल? हे काम पैसे घेऊन, वेठबिगारीनं झालेलं नसेल. याच्यामागे एक जिद्द असेल की, हा पर्वत कापून आपण इथं काहीतरी उभारूयात. हे ज्यांनी बनवले आहे, त्यांच्या अनेक पिढ्यांनी यासाठी काम केलेले असून प्रेम, संस्कार, संस्कृती आणि एका वचनबद्धतेतून याची निर्मिती झाली आहे. यातला एक हजारावा अंश जरी आपल्यामध्ये असेल तर हा देश आपण अतिशय सुंदर करू शकतो” अशा शब्दांमध्ये जावेद अख्तर यांनी वेरूळचे कौतुक केले.