सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात असलेल्या हरतळी गावच्या हद्दीत नीरा नदीपात्रात फिरण्यासाठी गेलेली 23 वर्षीय युवती बुडाली आहे. सोमवारी हि घटना घडली असून दिवसभर तिची शोध मोहीम राबविली जात होती. तेजल साळूंखे (वय 23, रा. वरुड, ता. खटाव) बुडालेल्या युवतीचे नाव आहे.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील सातारा जिल्ह्यातील खटाव येथील वरुड येथील युवती तेजल साळुंखे ही सोमवारी भाटघर धरणाच्या परिसरात फिरण्यासाठी गेली होती. हरतळी (ता. खंडाळा) हद्दीत असणाऱ्या एका पुलाजवळील नीरा नदीपात्रात तेजल साळूंखे ही उतरली असता पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात पडली. भाटघर धरणाच्या पावर हाऊसमधून नदीपात्रात पाणी सोडल्याने पाण्याचा वेग जास्त असल्याने बुडून बेपत्ता झाली. यावेळी घटनास्थळी असणाऱ्या व्यक्तीनं भोर पोलीस स्टेशनला याबाबत माहिती दिली.
भोर पोलीस, शिरवळ पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल झाले. त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून संबंधित रेस्क्यू टीमला फोन करून बोलावून घेतले. काल मंगळवारी, दि. ४ एप्रिल रोजी महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड रेस्क्यू टीम, शिरवळ रेस्क्यू टीमच्या सहकार्याने शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नवनाथ मदने, पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई, पोलीस अंमलदार आप्पासाहेब कोलवडकर, अजित बोराटे यांनी नीरा नदीपात्रात शोधमोहीम राबविली.
धरणावर फिरायला गेलेली 23 वर्षीय युवती नीरा नदीपात्रात बुडाली pic.twitter.com/HXjAwQlr3A
— santosh gurav (@santosh29590931) April 5, 2023
या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले होते. त्यांनी पोलिसांना शोधकार्य करण्यासाठी सहकार्य केले. मात्र, मुलीचा शोध न लागल्याने रात्री उशिरा शोध मोहीम थांबवण्यात आली. दरम्यान, आज सकाळपासून पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. सध्या नीरा नदी पात्रात पाणी सोडल्यामुळे शोध घेणाऱ्या रेस्क्यू टीमला अडथळे निर्माण होत आहेत.