हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज हिमाचल प्रदेश सरकारने मुलींच्या लग्नाच्या वयासंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात मुलींचे वय 21 वर्षे पूर्ण झाल्याशिवाय त्यांचे लग्न करता येणार नाही, असा निर्णय हिमाचल प्रदेश सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे आता हिमाचलमधील मुलींचे वय लग्नासाठी 21 पूर्ण असावे लागणार आहे.
मुलींचे लग्नाचे वय किती असावे यासंदर्भात आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत सरकारने हा निर्णय घेतला आहे. आता याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. आज शिमल्यामध्ये मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटची ही बैठक पार पडली. सुमारे 3 तास सुरू असलेल्या या बैठकीत मुलींच्या लग्नाच्या वयासंदर्भात एकमताने निर्णय घेण्यात आला.
तसेच, हिमाचल सरकारने आजच्या बैठकीत नव्या चित्रपट धोरणांना देखील मंजुरी दिली आहे. त्याचबरोबर चित्रपट परिषद बनवण्याची परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे आता हिमाचल प्रदेशमध्ये चित्रपटाच्या शूटिंगसाठी तीन दिवसांची परवानगी मिळणार आहे. महत्वाचे म्हणजे, कॅबिनेट बैठकीत विधवा एकल नारी योजना तसेच, डिजिटल पॉलिसीला हिमाचल प्रदेश सरकारने मंजुरी दिली आहे.