कराड – चिपळूण महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील कराड आणि पाटणमध्ये बिबट्याचा वावर चांगलाच वाढला आहे. मानवी वस्तीत बिबट्याचा संचार वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे सगळं असच सुरु आहे. आज (रविवारी) पहाटे कराड – चिपळूण महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे.

याबाबत अधिकची माहिती अशी कि, पाटण तालुक्यातील नेचर गावच्या हद्दीत रविवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती कळताच वनविभागाने घटनास्थळी तात्काळ धाव घेत पाहणी केली. धडक दिलेले वाहन घटनास्थळावरून पसार झाले असून त्याबाबत अधिक माहिती वनविभागाचे अधिकारी घेत आहेत. मृत बिबट्याचे पोस्ट मॉर्टम करण्यात येणार असून बिबट्याचे केस, नखे हे सुखरूप असल्याचे संबधित वनविभाग अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, कराड व पाटण तालुक्यात दिवसेंदिवस बिबट्याची संख्या वाढत असून आता मानवी वस्तीतही त्यांचा शिरकाव वाढलेला आहे. त्यामुळे रात्री-अपरात्री मुख्य मार्गावर बिबट्या आल्याने वाहनांच्या धडकेत मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढल्याचे दिसून येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा अपघाती मृत्यूच्या बातम्या आपण पाहत आहोत. आज पुन्हा एकदा अशी घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.