Monday, January 30, 2023

गणेशवाडीतून 70 वर्षीय महिलेला दवाखान्यात नेण्यासाठी जीवघेणा प्रवास

- Advertisement -

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके

भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत असताना एकाबाजूला संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. अशावेळी सातारा तालुक्यातील सांडवली-केळवली भागातील गणेशवाडी या गावातील 70 वर्षीय वृद्ध महिलेला शहरातील दवाखान्यात नेण्यासाठी झोळीच्या साहाय्याने जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. गणेशवाडी हे गाव साताऱ्यापासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर असून देखील या भागातील नागरिकांना अनेक संकटांना आणि समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आज मेट्रोचा सुसाट प्रवास सुरू होत असताना गणेशवाडीकर स्वातंत्र्यात की पारतंत्र्यात असा सवाल उपस्थित होत आहे.

- Advertisement -

या भागात मुसळधार पाऊस पडत असल्याने मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याने रस्ते चिखलमय आणि दलदलयुक्त झाले आहेत. चिंगुबाई भगवान माने (वय- 70) ही वृद्ध महिला आजारी पडल्याने तिला कावड करून खांद्यावर लाकडाच्या साहाय्याने गावातील 4 व्यक्तींनी मुख्य रस्त्यापर्यंत दवाखान्यात दाखल करण्यासाठी घेवून जावे लागत आहे. या गावाला जाण्या-येण्यासाठी रस्ता नसल्याने वृद्धांचे, विद्यार्थ्यांचे, गरोदर स्त्रियांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.

गणेशवाडी गावाला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातही सुविधा मिळत नसल्याने तोंड दाबून बुक्क्यांचा मारा सहन करावा लागत आहे. आजही लोकांना अशा पध्दतीने त्रास होत असताना दुर्गम डोंगरी भाग असल्याने याकडे लोकप्रतिनिधी, स्थानिक पुढारी आणि प्रशासन ढुंकून देखील पाहत नसल्याने या भागातील नागरिक पारतंत्र्यातील जीवन जगत असल्याचे चित्र दिसत आहे.