पहाटेच्या सुमारास स्फोटाने कराड हादरलं; 4 जण गंभीर जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राहत्या घरात पहाटे स्फोट होऊन चार जण जखमी झाल्याची दुर्घटना आज पहाटेच्या सुमारास कराड शहरातील हद्दवाढ भागातील मुजावर काॅलनी लगतच्या वस्तीत घडली. झालेला स्फोट इतका भीषण होता कि त्यात संबंधित घराची भिंत फुटून समोरच्या घरावर जावून आदळली. त्यामध्ये इमारतीचे मोठे नुकसान झाले असून ४ जण गंभीर जखमी तर अन्य तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत.

शरीफ मुबारक मुल्ला वय 36, सुलताना शरीफ मुल्ला वय 32, जोया शरीफ मुल्ला वय 10, राहत शरीफ मुल्ला वय 7, यांच्यासह अशोक दिनकर पवार वय 54, सुनीता अशोक पवार वय 45, दत्तात्रय बंडू खिलारे वय 80 (सर्व रा. मुजावर कॉलनी, शांतिनगर, कराड) अशी जखमींची नावे आहेत.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, आज बुधवारी पहाटे मुजावर कॉलनी परिसरात नागरिक झोपेत असताना पाण्याच्या टाकी जवळील शरीफ मुल्ला यांच्या इमारतीत भीषण स्फोट झाला. गॅस सिलेंडरच्या टाकीला गळती लागल्याने हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. स्फोटाच्या आवाजाने परिसर हादरून गेला. ज्या इमारतीत स्फोट झाला, त्या इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. भिंती पडल्या आहेत. तीन ते चार वाहनांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये दुचाकी गाड्यांचा समावेश आहे. खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/834085861830684

या घटनेत मुल्ला कुटुंबातील शरीफ मुल्ला, सुलताना मुल्ला, जोया मुल्ला, राहत मुल्ला असे चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर शेजारच्या घरातील अशोक पवार, सुनीता पवार, दत्तात्रय खिलारे असे आणखी तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इतर आणखी तीनजण किरकोळ जखमी झाले आहेत. स्फोटानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. या घटनेची कराड शहरात मोठी चर्चा सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच कराड शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलिसांकडून आसपासच्या परिसरात बॅरिकेट उभा करून गर्दी हटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.