माझ्या मागे लाखो अदृश्य हात; विशाल पाटलांच्या दाव्याने सांगलीत खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सांगली लोकसभा (Sangli Lok Sabha) निवडणुकीसाठी यंदा तिरंगी लढत आहे. भाजपकडून संजयकाका पाटील, महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) हे सांगली लोकसभेच्या रिंगणात आहेत. महाविकास आघाडीतील जागा वाटपाच्या तिढ्यामुळे सांगली लोकसभेची जागा संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत राहिली. काँग्रेसच्या आग्रहानंतरी ठाकरेंनी सांगलीची जागा न सोडल्याने सांगली काँग्रेसला आघाडीधर्म पाळून चंद्रहार पाटील यांचं काम करावं लागणार आहे. विश्वजित कदम स्वतः महाविकास आघाडीच्या सभेला उपस्थित सुद्धा राहिले होते त्यामुळे ते चंद्रहार पाटलांचेच काम करणार हे फिक्स झालं. मात्र आता अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या एका विधानाने खळबळ उडाली आहे. माझ्या मागे लाखो अदृश्य हात असून फिरलेल्या वाऱ्याचं वादळ झालंय असं विशाल पाटील यांनी म्हंटल.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचितच्या उमेदवारीमुळं मला पराभव स्वीकारावा लागला. मात्र या निवडणुकीत प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्या प्रत्यक्षात उतरताना दिसत आहेत . एवढच नव्हे तर काँग्रेसवर प्रेम करणारे कार्यकर्ते आणि नेते माझे काम करत आहे. माझ्यामागे लाखोंच्या संख्येनं अदृश्य हात आहेत. हे हात कोणत्याही दबावाला बळी पडणार नाहीत असंही विशाल पाटील म्हणाले. त्यामुळे खळबळ उडाली आहे. विशाल पाटील यांच्यामागील अदृश्य शक्ती कोण या चर्चाना उधाण आलं आहे.

विश्वजित कदम यांच्याबद्दल मोठं विधान –

यावेळी विशाल पाटील यांनी आपण शेवटपर्यंत विश्वजीत कदम यांचे नेतृत्व आपण मान्य करणार असं म्हंटल आहे. विश्वजीत कदम हे राज्याचे नेते असून महाराष्ट्र काँग्रेसचे भविष्य आहेत. त्यामुळे लोकसभेचा निकाल काहीही लागला तरी आम्ही विश्वजीत कदम यांचे नेतृत्व शेवटपर्यंत मान्य करणार आहोत असं त्यांनी म्हंटल. विशाल पाटील आपलाच उमेदवार आहे अशी लोकांची भावना आहे तसेच काँग्रेसवर प्रेम करणारे लाखी अदृश्य हात माझ्या पाठीशी आहेत असं विशाल पाटील यांनी म्हंटल आहे. हे अदृश्य हात नेमके कोण आहेत ते आता निवडणुकीच्या निकालानंतरच समजेल.