खोजेवाडी येथे खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून नवीन वीज उपकेंद्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून सातारा तालुक्यातील खोजेवाडी येथे नवीन वीज उपकेंद्र मंजूर झाले आहे. तशी माहिती त्यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली असून या उपकेंद्रामुळे खोजेवाडी परिसरातील वीजेची समस्या कमी होऊन विद्युत पुरवठा सुरळीत होणार आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघात विकासकामा संदर्भात आग्रही असणारे खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून हे उपकेंद्र मंजूर झाले आहे. पुर्नोत्थान वितरण क्षेत्र योजनेत अतंर्गत खोजेवाडी येथे सुमारे 3 कोटी खर्चाचे 33/11 केव्ही क्षमतेचे वीज उपकेंद्र मंजूर झाले आहे. त्यामुळे खोजेवाडी परिसरातील देशमुख नगर, नांदगाव, फत्त्यापूर मत्यापूर, अपशिंगे, बोरगाव, कामेरी, धोंडेवाडी आदी गावांसह अन्य गावातील वीज पुरवठा नियमित होणार आहे. सध्या सुरू असलेल्या सिंगल फेज योजना बंद करून चोवीस तास थ्री फेज वीज पुरवठा गावठाण परिसरात देता येणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा योजना, घरगुती वीज व लघु उद्योगांना याचा फायदा होणार आहे.

दरम्यान, खोजेवाडी येथील कामाची लवकरच सुरूवात होणार असून या उपकेंद्रामुळे खोजेवाडी आणि लगतचा ग्रामीण परीसर लोड शेडिंग मुक्त होणार आहे. सदर भागातील लोड शेडींगची समस्या सोडवण्यासाठी खा.श्रीनिवास पाटील यांनी महावितरण विभागाकडे पत्रव्यवहार केला होता. याबाबत महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, बारामती परिमंडळचे मुख्य अभियंता सुनील पावडे, साताराचे अधीक्षक अभियंता
गौतम गायकवाड व उप कार्यकारी अभियंता प्रशांत वाघ यांचे सहकार्य मिळाले. अतित (ता. सातारा) येथेही उपकेंद्र करण्यासाठी प्रस्ताव दिला असून ते केंद्र देखील मंजूर होण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती खा.श्रीनिवास पाटील यांनी दिली.