विद्यार्थ्यांच्या कानशिलात लगावल्याने शाळेच्या संस्थापिका, शिक्षिकेवर पोलिसात गुन्हा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

पांचगणी येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत विद्यार्थ्याला शिक्षा करून मारहाण केल्याच्या कारणास्तव शाळेच्या संस्थापिका सिलींन वायाफुली, शिक्षिका अनुप्रिता (पुर्ण नाव माहीत नाही) या दोन महीला विरोधात आंब्रळ येथील विद्यार्थ्याच्या पालकांनी पांचगणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रासह, पांचगणी व परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत पांचगणी पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, दि. 17/08/2022 रोजी सकाळी 8.30 ते 09.00 वा चे दरम्यान मौजे पांचगणी (ता. महाबळेश्वर) येथील स्काॅलर फाउंडेशन स्कूल या शाळेत मुलास युनिफॉर्म बाबत उलट बोलल्याचा राग मनात धरून त्या शाळेतील शिक्षिका अनुप्रिता व सिलींन वायफुल्ली (पुर्ण नाव माहित नाही) यांनी मुलास वर्गाचे बाहेर ऊभे राहण्याची शिक्षा करुन अपमानीत करुन दोघींनी त्याचे कानशीलात हाताने मारहाण करुन दमदाटी केली. याबाबतची फिर्याद सुनिल शंकर आंब्राळे (वय- 22, रा. खत्री व्हिला बंगला, आंब्रळ. ता. महाबळेश्वर, जि. सातारा) यांनी आज पोलीस ठाण्यात दिली आहे.

यानुसार पांचगणी पोलिसांनी अनुप्रिता व सिलींन वायपूली या दोघी विरोधात भादविस कलम 323, 506, 34 अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा 2015 चे कलम 82, 75 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास पांचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोना निलेश माने व त्यांचे सहकारी करीत आहेत.