दुचाकी-सुमो अपघातात 10 वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू; दोन जण जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

दहावीच्या निरोप समारंभादिवशी दुचाकी-सुमो कारच्या अपघातात दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना पाटण तालुक्यातील मरळी येथे आज घडली आहे. या अपघातात प्रतिक रमेश पाटील (वय 16) या शाळकरी विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोनजण जखमी झाले आहेत. दहावीच्या परीक्षेच्या तोंडावर झालेल्या दुर्दैवी अपघातामुळे शालेय विद्यार्थ्यांसह परिसरातील ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मरळी, ता. पाटण येथील विद्यालयाचा आज दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन समारंभ होता. त्यासाठी प्रतिक रमेश पाटील (वय 16), हर्षवर्धन गजानन पाटील (वय 16), सुमित निवास टोपले (वय 16) हे तिघे मरळीकडून मरळी कारखान्याकडे दुचाकीवरून (क्र. एमएच 50 बीए 7584) निघाले होते. यावेळी गणेश मंदिराच्या उताराला त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटला. त्यामुळे ते तिघेही दुचाकीसह समोरुन येणाऱ्या चारचाकी सुमोला (एमएच 05 एबी 2495) समोरासमोर धडकले.

ही धडक इतकी जोराची होती की यातील दुचाकीवरील प्रतिक रमेश पाटील याचा जागीच मृत्यू झाला. तर हर्षवर्धन पाटील व सुमित टोपले हे दोघे जखमी झाले. त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

दहावीच्या परीक्षेपूर्वी प्रतिकचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने मरळी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघाताची नोंद मल्हारपेठ पोलीस ठाण्यात झाली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पी. एच. जगदाळे, पी. व्ही. पाटील करत आहेत.