Monday, January 30, 2023

नवरात्रोत्सवानिमित्त महिला आरोग्यासाठी विशेष अभियान; एकनाथ शिंदेंची घोषणा

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी विशेष आरोग्य अभियान राबवण्याची घोषणा आहे. ‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ असे या अभियानाचे नाव आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यातील सर्व माता-भगिनींनी आपल्या आरोग्याची तपासणी करावी, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

एक विडिओ ट्विट करत एकनाथ शिंदे म्हणाले, आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. या वर्षी गणेशोत्साप्रमाणे नवरात्री उत्सवही निर्बंधमुक्त वातावरणात साजरा करत आहोत. त्यासोबतच सार्वजनिक आरोग्यविभागातर्फे ‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ हे अभियान राबवलं जाणार आहे. २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर दरम्यान राज्यातील सर्व मातांच्या आरोग्यासाठी हे अभियान आपण राबवत आहोत.

- Advertisement -

“सुदृढ समाजासाठी महिलांचं आरोग्य हा आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. कुटुंबाची काळजी घेणारी माता काम करण्याच्या व्यापामुळे आपल्या आरोग्याकडे लक्ष देऊ शकत नाही. ती निरोगी रहावी. ती जागरूक व्हावी आणि समाजातही तिच्या आरोग्याबाबत संवेदनशीलता निर्माण व्हावी. यासाठी आपल्या शासनाकडून ‘आदरयुक्त भावनेतून माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ हा उपक्रम राबवला जात आहे, या महोत्सवानिमित्त सर्व माता-भगिनींनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी”. मातृत्त्वाचा सन्मान हाच आपला अभिमान आहे असेही एकनाथ शिंदे यांनी म्हंटल.