शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ‘नई आशा नई दिशा’ उपक्रम सक्रिय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे। योगेश जगताप

तळेगाव आणि आजूबाजूच्या ४० गाव/वाड्या/ वस्त्यांमधील १४ ते १८ वयोगटातील मुलांची काय स्थिती आहे..? हे पाहण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून एक सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये १५२ मुलांशी आणि त्यांच्या पालकांशी संवाद साधून त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला गेला व यातील पहिल्या टप्प्यात ४२ मुलांनी मुक्त शाळेतून दहावीची तयारी सुरू केली आहे. ज्यामध्ये ६०% पेक्षा जास्त मुलींचा सहभाग आहे. ही मुले संस्थेच्या अभ्यास केंद्रात गेल्या ३ महिन्यापासून नियमित अभ्यास करत आहेत. या कार्यात एफ एम फाऊंडेशनचे सक्रीय सहकार्य लाभले आहे. या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा २० एप्रिल २०२३ रोजी लायन्स क्लब तळेगाव दाभाडे येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला एफएम फाऊंडेशनचे अधिकारी डायरेक्टर एच आर श्री मयंक गर्ग, एफएम फाऊंडेशनचे जनरल डेलिगेट्स ऑलीवर मोटे हे खास फ्रांस देशातून उपस्थित राहिले होते. तर सामाजिक कार्यकर्त्या साधना खटी व श्रीनिवास खटी देखील उपस्थित होते.

शाळाबाह्य मुलांचे शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर फेकले जाणे हे मुक नाट्याच्या माध्यमातून सादर करणे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. मुलांनी त्यांच्या शाळा सोडण्याची जी कारणे सांगितली ती आपल्या शिक्षण पद्दतीवर प्रश्न निर्माण करणारी होती. ज्यात अनेक मुलांना शाळेमध्ये फी भरता आली नाही म्हणून त्यांना शिक्षण सोडावे लागले. तर वंचित मुलांना शाळांमध्ये भेदभावाची वागणून मिळत असल्यामुळे त्यांना नाईलाजास्तव शाळा सोडावी लागली. बाल मजुरी, बालविवाह, मुलगा- मुलगी भेदभाव ही शाळा सोडण्याची प्रमुख कारणे होती. असा मुक नाटकाचा सार होता. नाटकाची रचना सायली राउधल आणि स्वागत नृत्य तृषा महेंदरकर यांनी केले.

संस्थेच्या माध्यमातून मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात राहता यावे म्हणून काही महत्वाच्या गरजांचा उल्लेख केला गेला आहे. यामध्ये खालील बाबींचा समावेश आहे. १) १८ वर्षापर्यंतचे शिक्षण मोफत आणि सक्तीचे करावे.
२) समाजामध्ये आणि खास करून शिक्षकांमध्ये वंचित घटकातील मुलांविषयी संवेदनशीलता वाढण्यासाठी खास कार्यक्रमांची आवश्यकता.
३) वंचित घटकातील मुलांना शाळांमध्ये समायोजन करणे सोपे जावे म्हणून मदतीसाठी शाळांमध्ये समुपदेशकाची आवश्यकता.
४) प्राथमिक शाळांमध्ये माध्यमिक वर्ग वाढविणे जेणेकरून मुलांना शाळेसाठी दूरवर जाण्याची गरज भासणार नाही.
५) सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था अधिक सक्षम करणे आणि वाड्या- वस्त्यांपर्यंत ही व्यवस्था पोहचेल यासाठी खात्रीशीर उपाययोजना करणे.
६) शिक्षण अधिक उल्हासी पद्धतीने देणे.
७) शाळांमध्ये वंचित मुलांसाठी विशेष वेळ देणे. जेणेकरून भाषेमुळे त्यांना अभ्यास करण्यासाठी जी जास्तीची मदत आवश्यक आहे ती मिळेल.
८) शाळांमध्ये शिक्षकांची संख्या वाढविणे.
अशी माहिती संस्थेच्या संस्थापिका प्रभा विलास यांनी दिली. या कार्यक्रमात दिपाली देशमुख, संध्या दाभाडे, सुषमा जायगुडे, श्वेता देशपांडे, तृप्ती बनसोडे, स्वाती सूर्यवंशी, श्रद्धा तेलंगे, सूरज कांबळे, अरुणा जगदाळे, वंदना धिंडाळे, आशा शेख, शिल्पा आगळे, श्वेता पिंगळे यांचे विशेष सहकार्य होते.