साकुर्डीत वीज कोसळल्याने ट्रान्सफर्मर आणि पिंपळाचे झाड जळाले : अख्ख गाव अंधारात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | विजेच्या गडगडाटासह कोसळत असलेल्या परतीच्या पावसामुळे अनेक ठिकाणी हानी होत आहे. कराड तालुक्यातील साकुर्डी येथे मंगळवारी रात्री 8 वाजता वीज कोसळल्याने पिपळाचे झाड व ट्रान्सफार्मर जळाल्याची घटना घडली. त्यामुळे संपूर्ण गाव रात्रभर अंधारात होते. वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत मुसळधार पावसातही ट्रान्सफार्मर बदलल्याने 18 तासांनी लाईट आली.

कराड- पाटण मार्गावर साकुर्डी गावातील ट्रान्सफार्मर व पिंपळाच्या झाडावर वीज पडली. मंगळवारी सायंकाळी 8 वाजण्याच्या सुमारास मुसळधार पाऊस सुरू होता. या दरम्यान, वीज पडल्याने मोठा आवाज झाला अन् साकुर्डी गावातील लाईट गेली होती. यावेळी झाड जळत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात येताच, ट्रान्सफार्मर जळाल्याचेही गावकऱ्यांच्या लक्षात आले. परंतु मुसळधार पावसामुळे कोणीच काही करू शकत नव्हते. रात्रभर कोसळत असलेल्या पावसामुळे संपूर्ण रात्र गावकऱ्यांना अंधारात काढावी लागली.

आज सकाळी वीज वितरणचे कर्मचाऱ्यांनी श्रीधर घोडके, सुर्यकांत कणसे, अक्षय राऊत, मंदार पवार, विजय कांबळे यांनी भरपावसात काम सुरू केले. सकाळी 8. 30 वाजता जळालेला ट्रान्सफार्मर काढला. तेथून तो अोगलेवाडी येथील मुख्य कार्यालयात नेण्यात आला व तेथून नविन ट्रान्सफर आणून दुपारी 2 वाजता बसविण्यात आला. त्यामुळे तब्बल 18 तासांनी साकुर्डीत पुन्हा लाईट आली. कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत लाईट पुन्हा कार्यान्वित केल्याने ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.