खुन्नसने केला तिघांनी तरुणावर चाकूने हल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

खुन्नसने पाहिल्याचा कारणावरून तिघांनी एका युवकावर चाकूने वार केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास कराड बसस्थानक परिसरात घडली. या हल्ल्यात संबंधित युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्या मित्रालाही हाताने मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघाजणांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुदर्शन यादव, दीपक आवळे व एकजण अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर अजय भगवान खैरमोडे असे चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कराड शहरातील रविवार पेठेत राहणारा अजय खैरमोडे हा युवक गुरुवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास त्याचा मित्र संग्राम सावंत याच्यासोबत दुचाकीवरून चहा पिण्यासाठी निघाला होता. त्यावेळी कराड बसस्थानका समोरील चौकात सुदर्शन यादव, दीपक आवळे व अन्य एकाने त्यांना अडवले. तसेच “माझ्याकडे काय बघतोयस,” असे विचारुन शिविगाळ केली. त्यावेळी अजयने सुदर्शनला “शिव्या का देतोय,” असे म्हंटले.

अजयचे बोलणे ऐकल्यानंतर चिडून जाऊन संतापाच्या भरात सुदर्शन, दीपक व अनोळखी एका युवकाने अजयला मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच त्याच्या दुचाकीवर दगड घालून दुचाकीचे नुकसान केले. यावेळी खाली पडलेल्या अजयवर सुदर्शनने चाकुने हल्ला केला. यामध्ये अजय गंभीर जखमी झाला. या झटापटीनंतर जखमी अजय खैरमोडे याला तात्काळ कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच या घटनेची पूर्ण माहिती घेतली. त्यानंतर अजय व त्याच्या मित्रास मारहाण केल्याबद्दल व अजयवर जीवघेणा हल्ला केल्याबद्दल तिघाजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे.