पवारांनी भाकरी फिरवलीच; पंढरपूर मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून ‘हा’ उमेदवार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सर्वपक्षीय नेत्यांसोबत चांगले संबंध असणारे अभिजित पाटील कोणत्या पक्षात जाणार याकडे गेल्या अनेक दिवसांपासून लक्ष्य लागलं होते. अखेर आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी अभिजित पाटील हेच आगामी पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील असे स्पष्ट संकेत सुद्धा शरद पवारांनी दिले.

आज विठ्ठल साखर कारखान्याच्या बायो सीएनजी प्रकल्पाचे उद्‌घाटन शरद पवार पवारांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार रोहित पवार, खासदार ओमराजे निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, बबनराव शिंदे, संदीप क्षीरसागर, संजय पाटील, कैलास पाटील, रवींद्र धंगेकर, माजी आमदार राजन पाटील, दीपक साळुंखे, महेश कोठे यांच्यासह पक्षाचे नेते उपस्थित हेाते. अभिजित पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर विद्यमान आमदार समाधान आवताडे आणि अभिजित पाटील यांच्यात तगडी लढत पाहायला मिळू शकते. शरद पवार यांनीही आपल्या भाषणात अभिजित पाटील यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिले.

शरद पवार म्हणाले, भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर तालुक्यात नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली आहे . ती भरून काढण्याचं काम अभिजीत पाटील करतील. पुढच्या निवडणुकीला पंढरपूरचा राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर अभिजीत पाटील हे असलं पाहिजे. यासंबंधीची तयारी आता तुम्ही सुरू करा, असे शरद पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे अभिजित पाटील यांची उमेदवारी शरद पवार यांनी पक्की केल्याचं समोर येत आहे.