“वंदे मातरम् म्हणणार नाही, कारण आम्ही अल्लाहला मानतो..”; अबु आझमींच्या वक्तव्यावर विधानसभेत गदारोळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीच बुधवारी सभागृहात चांगलाच गदारोळ पाहिला मिळाला आहे. अधिवेशनात “वंदे मातरम” (Vande Mataram) बाबत केलेल्या वक्तव्यामुळे समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी (Abu Azmi) वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. आम्ही अल्लाहला मानतो, त्यामुळे आम्ही ‘वंदे मातरम्’ ही घोषणा देणार नसल्याचे वक्तव्य अबू आझमी यांनी केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षांनी चांगला आक्षेप घेत सभागृहात गदारोळ माजवला, त्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापल्याचे पाहायला मिळालं.

अबू आझमी नेमकं काय म्हणाले? 

आज अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सभागृहात एक उदाहरण देत अबू आझमी म्हणाले की, “आम्ही वंदे मातरम म्हणू शकत नाही, कारण आम्ही एका अल्लाहला मानतो. त्यामुळे जगात आम्ही दुसरीकडे कुठेही माथा टेकवू शकत नाही. आमच्या आईसमोरही आम्ही माथा टेकवत नाही. आमचा धर्म या कृतीची परवानगी देत नाही. अबू आझमी यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत सभागृहात विरोधी पक्ष नेत्यांनी चांगलाच गोंधळ सुरू केला. यानंतर गोंधळलेले वातावरण निवळण्याचा प्रयत्न सभागृह अध्यक्षांकडून करण्यात आला. तसेच आझमी यांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. फडणवीस यांनी दिलेल्या प्रत्युत्तरावर अनेक नेत्यांनी सहमती दाखवत वातावरण शांततेत घेतले.

फडणवीसांनी काय दिले प्रत्युत्तर?

अबू आझमी यांच्या वादग्रस्त विधानानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या देशातल्या कोट्यवधी लोकांची ‘वंदे मातरम्’ या भावनेवर श्रद्धा आहे. आझमींनी केलेले वक्तव्य बरोबर नाही. मला सांगा असा कोणता धर्म सांगतो की, आपल्या आईला सन्मान करू नका. वंदे मातरम् कोणतेही धर्म गीत नाही. ते आपले आपले राष्ट्रगान आहे. तुमची भावना योग्य नाही” अशा शब्दात फडणवीस यांनी आझमी यांना सुनावले.

दरम्यान आमदार अबू आझमी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर विरोधी पक्ष नेत्यांमध्ये त्यांच्याविषयी क्रोध पाहायला मिळत आहे. तसेच सोशल मीडियावर देखील आझमी यांच्या वक्तव्यावर टीका करण्यात आली आहे. नेटकऱ्यांनी या वक्तव्यावर चांगलाच आक्षेप घेतला आहे. सध्या सोशल मीडियावर आझमी यांच्या या वक्तव्याची क्लिप व्हायरल होत आहे.