पालघर जिल्ह्यात ट्रक आणि बसचा भीषण अपघात; तब्बल 55 प्रवासी जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शुक्रवारी पहाटे पालघर जिल्ह्यात एका ट्रकशी बसची टक्कर झाल्यामुळे तब्बल 55 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांमध्ये शाळकरी आणि महाविद्यालयीन मुलांचा जास्त समावेश आहे. या सर्व प्रवाशांना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळतात स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यावेळी अनेक प्रवासी जखमी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर ताबडतोब जखमी प्रवाशांना उपचारासाठी हलवण्यात आले. आता या संपूर्ण घटनेचा पोलिसांकडून तपास केला जात आहे.

एमएसआरटीसी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ठीक सातच्या दरम्यान पालघर जवळील देसाई गावात हा अपघात घडला. एमएसआरटीसीची बस थेट येऊन एका ट्रकची धडकली. ज्यामुळे विद्यार्थ्यांसहित 55 प्रवासी जखमी झाले. या बसमध्ये सर्वात जास्त कॉलेज आणि शाळकरी विद्यार्थी होते. तसेच, एकूण बसमधल्या प्रवाशांची संख्या 70 होती. ज्या प्रवाशांना कोणतीही दुखापत झालेली नाही अशा प्रवाशांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवण्यात आले आहे. सध्या पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करीत आहेत.

दरम्यान, राज्य सरकारकडून महाराष्ट्रात नवनवीन महामार्गाची निर्मिती करण्यात येत आहे. मात्र दुसऱ्या बाजूला याच महाराष्ट्रात अपघाताचे प्रमाण देखील वाढताना दिसत आहे. दिवसेंदिवस अपघातांच्या घटनेमध्ये वाढ होत असल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेतेबाबतचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्य म्हणजे, सर्वात जास्त अपघात हे पहाटेच्या वेळी होत असल्याचे समोर आले आहे. ड्रायव्हरचा निष्काळजीपणा, पहाटेची डोळ्यावर आलेली झोप, रस्ता नीट न दिसणे अशी अनेक कारणे अपघातासाठी कारणीभूत ठरत आहेत.