कर्नाटकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पुतळ्याचं दहन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावाद चांगलाच पेटला असून दोन्ही राज्यात वाहनांच्या नुकसानीच्या घटना घडल्या. यानंतर महाराष्ट्रातील अनेक पक्षातील खासदारांनी सीमावादाचा प्रश्न केंद्राने सोडवावा अशी मागणी केली आहे. वाहनाच्या तोडफोडीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी फोनवरून चर्चाही केली. मात्र, कर्नाटकमध्ये कन्नड रक्षक वेदिकेच्या वतीने आंदोलन करण्यात आले असून संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुतळ्याचे दहन केले आहे.

कन्नड रक्षक वेदिका संघटनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून कार्यकर्त्याच्यावतीने कर्नाटकातील गडगमध्ये आज पुन्हा आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी कार्यकर्त्याच्यावतीने भर चौकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड करत त्यांना ताब्यात घेतले.

बेळगावात वाहनांच्या घडलेल्या तोडफोडीच्या घटनेनंतर महाराष्ट्रात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार यांनीही पत्रकार परिषद घेत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना इशारा दिला होता. मात्र, आज कर्नाटकातील गदगमध्ये कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत जोरदार निदर्शन केली आहेत. यावेळी महाराष्ट्रातून कर्नाटकात गेलेल्या वाहनांवर चढून कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी कार्यकर्त्यांच्या वतीने मुख्यमंत्री शिंदे यांच्या पुतळ्याचे दहन करत संताप व्यक्त करण्यात आला.