‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधवचा डंपरच्या धडकेत मृत्यू

Kalyani Kurale Jadhav
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘तुझ्यात जीव रंगला’ या मराठीतील लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधव यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. कोल्हापूरमधील हालोंडी सांगली फाटा याठिकाणी एका डंपरच्या धडकेत कल्याणी यांनी आपले प्राण गमावले. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे.

अभिनेत्री कल्याणी यांनी ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेसह अनेक मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमठवला होता. कल्याणी यांनी काही दिवसांपूर्वीच ‘प्रेमाची भाकरी’ नावाचे हाॅटेल सुरु केले होते. शनिवारी रात्री हॉटेल बंद करून बाहेर पडत असतानाच डंपरने धडक दिल्याने त्यांचे निधन झाले.

कल्याणी जाधव या मूळच्या कोल्हापूरच्या असून सध्या महावीर कॉलेज परिसरात वास्तव्यास होत्या. त्या छोट्या पडद्यावरुन प्रसिद्धीझोतात आल्या होत्या. त्यांनी झी मराठी वाहिनीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत सहाय्यक व्यक्तिरेखेची भूमिका साकारली होती. यामुळे त्यांना घराघरात ओळख मिळाली. त्याबरोबर त्यांनी ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या मालिकेतही काम केले होते. त्यांची या मालिकेतील ही भूमिकाही चांगलीच गाजली होती.

https://www.instagram.com/reel/CkpQTiWId7t/?utm_source=ig_web_copy_link

वाढदिवसाची Instagram वरील ‘ती’ शेवटची पोस्ट…

कल्याणी कुरळे यांनी आठवडाभरापूर्वीच त्यांचा वाढदिवस साजरा केला होता. त्यावेळी इंस्टाग्राम हँडलवर एक खास पोस्ट करून त्यांनी एक व्हिडिओसुद्धा पोस्ट केला होता. या पोस्टमधील तिने जे लिहिलं होत ते वाचून आता सर्वच भावुक होत आहेत. “काल माझा वाढदिवस मी लोकांना प्रेमाची भाकरी करून खायला देण्यात घालवला… मला खूप आनंद झाला मी माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी कुठे बाहेर गेले नाही ना पार्टी केली…मी माझ्या वाढदिवसानिमित्त लोकांना प्रेमाची भाकरी करून खायला घातली हे फक्त स्वामींनी माझ्या कडून करून घेतले आहे. असेच प्रत्येक वाढदिवसाला होऊदे .. स्वामी मला तुमचे आशीर्वाद तर आहेतच असेच आशीर्वाद नेहमी असुदेत .. मला हे सगळ करण्यासाठी शक्ती द्या..,” असे कल्याणी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले होते.