ठाकरेंनी शिंदेंना विचारलं होतं, तुम्ही बंडखोरीचा विचार करत आहात का?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करत मुख्यमंत्रीपद मिळवले तसेच आता केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह सुद्धा एकनाथ शिंदे यांना दिल्यांनतर ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे. यातच आता आदित्य ठाकरेंनी शिंदेंच्या बंडाबाबत मोठा खुलासा केला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करण्याच्या आधी 1 महिन्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी त्यांना विचारलं होतं, तुम्ही बंडखोरीचा विचार करत आहात का? असा गौप्यस्फोट आदित्य ठाकरेंनी केला.

लोकमतच्या एका कार्यक्रमात बोलताना आदित्य ठाकरेंनी वरील खुलासा केला. शिंदेंच्या बंडाची कुणकुण आम्हाला लागली होती. उद्धव ठाकरेंवर मानेच्या दुखण्यामुळं दोन शस्त्रक्रिया झालेल्या होत्या. त्याचवेळी एकनाथ शिंदेंच्या मनात वेगळचं काहीतरी सुरु होतं. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर मुख्यमंत्री होता येईल का? याची कदाचित ते चाचपणी करत होते, त्यांच्यावर मोठा दबावही होता. आणि याची कुणकुण आम्हाला लागली होती. त्यामुळं तुम्ही बंडखोरीचा विचार करत आहात का? अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी त्यांच्याकडं केली होती असं आदित्य म्हणाले.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही दोस्त मानता कि शत्रू असं विचारलं असता फडणवीस आणि आम्ही राजकारणात विरोधक आहोत. पण आमचं वैयक्तिक शत्रूत्व नाही, विचारांची लढाई लढताना वैयक्तिक शत्रुत्व ठेवण्याचे वातावरण आमच्या घरात कधीही नव्हते असं आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलं.