हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षांसाठी प्रवेशपत्रे (Admit cards) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिली आहेत. विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरून 10 जानेवारीपासून डाऊनलोड करता येतील.
येत्या 11 फेब्रुवारी 2025 पासून बारावीचे पेपर (12th Exams) सुरू होणार आहेत. त्यापूर्वी ही प्रवेशपत्रे सर्व शाळांनी प्रिंट करून मुख्याध्यापकांच्या शिक्क्यासह विद्यार्थ्यांना वितरित करायची आहेत. यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारू नये, असे निर्देश मंडळाने दिले आहेत. उशिरा अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे “लेट पेड स्टेटस” या पर्यायाद्वारे दिली जातील.
महत्वाचे म्हणजे, विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रातील त्रुटी सुधारण्यासाठी ऑनलाईन ‘अॅप्लिकेशन करेक्शन’ सुविधा उपलब्ध आहे. परंतु यासाठी शुल्क आकारले जाईल. सुधारित प्रवेशपत्रे विभागीय मंडळाच्या मंजुरीनंतर उपलब्ध होतील. फोटो नसलेल्या प्रवेशपत्रांवर संबंधित शाळांनी फोटो चिकटवून शिक्क्यासह स्वाक्षरी करायची आहे. प्रवेशपत्र गहाळ झाल्यास शाळांनी नवीन प्रिंट देऊन त्यावर “द्वितीय प्रत” असे नमूद करावे, असे सूचनाही मंडळाने दिल्या आहेत.